लक्ष्मण राऊत, लोकसत्ता
जालना : लोकसभा निवडणुकीसाठी १ जानेवारी २०२४ च्या अर्हता दिनांकाच्या आधारावर जालना जिल्ह्यातील १८ आणि १९ वर्षे वयोगटातील मतदारांत स्त्री-पुरुष संख्येत फार मोठी तफावत समोर आली आहे. या तरुण वयाच्या गटात पुरुष मतदारांचे प्रमाण ६४.७५ टक्के आहे. परंतु त्या तुलनेत स्त्री मतदारांचे प्रमाण ३५.२५ टक्के एवढे कमी आहे
जिल्ह्यातील जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात आहेत. तर घनसावंगी आणि परतूर विधानसभा मतदार संघाचा समावेश परभणी लोकसभा मतदार संघात आहे. या सर्व विधानसभा मतदार संघांची एकत्रित आकडेवारी पाहिली तर १८ आणि १९ वर्षे वयोगटात एकूण १८ हजार २८८ मतदार आहेत. त्यामध्ये ११ हजार ८३९ पुरुष मतदार आहेत तर स्त्री मतदारांची संख्या ६ हजार ४४७ आहे.
आणखी वाचा-शिरुरमध्ये अमोल कोल्हे – आढळराव पाटील यांच्यात पुन्हा लढत
८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जालना जिल्ह्यातील मतदारांत मात्र पुरुषांच्या तुलनेत स्त्री मतदारांचे प्रमाण मोठे आहे. या वयोगटात पुरुषांचे प्रमाण ३७.६८ टक्के असून स्त्री मतदारांचे प्रमाण ६२.३२ टक्के आहे. त्या वयोगटातील मतदारांची एकूण संख्या २८ हजार ७१३ आहे. त्यामध्ये १० हजार ८१७ पुरुष तर १७ हजार ८९६ स्त्री मतदार आहेत.
आणखी वाचा-‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम, ३० वर्षांनंतर दलित अध्यक्ष
जिल्ह्यातील एकूण मतदारांतील संख्येत स्त्रीयांचे प्रमाण पुरुष मतदारांच्या तुलनेत ५.०४ टक्के एवढे कमी आहे. जिल्ह्यात ८ लाख २५ हजार १६५ पुरुष मतदार तर ७ लाख ४६ हजार २४ स्त्री मतदार आहेत. सामाजिक विषयाचे अभ्यासक प्रा. बी. वाय. कुळकर्णी यांनी या अनुषंगाने सांगितले की, जिल्ह्यातील एकूण मतदारांत स्त्री मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जवळपास पाच टक्के कमी असले तरी १८ आणि १९ वर्षे या वयोगटातील हे प्रमाण फारच कमी आणि पुरुष आणि स्त्री संख्येतील तफावतीमुळे चिंताजनक आहे. या गटातील मुली लग्न होऊन बाहेरच्या जिल्ह्यात गेल्या असण्याची एक शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरली तर जिल्ह्यात मुलांचे विवाह उशिरा आणि मुलींचे विवाह लवकर होतात, असा त्याचा अर्थ होतो. जिल्ह्याचा ऐशी टक्के भाग ग्रामीण असून तेथे मुलींचा विवाह लवकर करण्याची प्रवृत्ती दिसून येते, असे मत त्यांनी मांडले. जिल्ह्यात ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांत पुरुषांच्या तुलनेत स्त्री मतदारांची संख्या मोठी असण्यामागे विवाहाच्या वेळचे वयातील अंतर मोठे असणे हे असू शकते.