आगामी महानगरपालिका, नगरपालिका वा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने (ठाकरे) यांनी केल्याने महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोेरे जाणार नाहीत हे स्पष्ट झाले. त्याच वेळी महायुती म्हणून लढण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी आधी घोषणा केल्याप्रमाणे अजित पवार गट स्वबळावर लढण्यावर ठाम आहे का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा वा विधानसभेला आमची भाजप व शिवसेनेबरोबर (शिंदे) महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर केली होती. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. यानुसार आमच्या पक्षाचा विस्तार करण्याकरिताच आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढू, असे अजित पवारांनी तेव्हा जाहीर केले होते.
हेही वाचा : इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले….
शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात महायुतीतून लढण्यााचा सूर लावण्यात आला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महायुती म्हणून आम्ही लढू, असे जाहीर केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचे सुतोवाच केले. या पाश्वर्भूमीवर अजित पवारांच्या स्वबळाच्या नाऱ्याचे काय होणार याची उत्सुकता असेल. महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाण्याची भाजपची योजना असली तरी तिन्ही पक्ष एकत्र राहणे कठीणच आहे. मुंबई, ठाणे परिसरात शिंदे गट अधिक जागांवर आग्रही असेल. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा फायदा होऊ नये म्हणून भाजप कदाचित शिवसेना शिंदे गटाला बरोबर ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व भाजप मान्य करणार का, यावर सारे अवलंबून असेल. कारण ठाणे जिल्हा या आपल्या प्रभाव क्षेत्रात शिंदे यांना महायुतीत सर्वाधिक हवे असतील. विधानसभा निवडणुकीतील विजयापासून भाजपची सुरू झालेली घौडदौड लक्षात घेता, भाजप शिवसेनेच्या शिंदे गटापुढे नमते घेण्याची शक्यता फार कमी दिसते.
हेही वाचा : Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
अजित पवारांना पुणे, पिंपरी-चिंचवड, नगर, सोलापूर, संभाजीनगर, कोल्हापूर अशा काही महापालिकांमध्ये अधिक रस आहे. महायुतीतून लढल्यास त्यांच्या पक्षाच्या वाट्याला कमी जागा येतील. हे लक्षात घेऊनच अजित पवारांनी स्वबळाचा नारा दिला. यातून पक्षाचे कायर्कर्ते पक्ष सोडणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घेतली.
सहा पक्षांमध्ये लढत ?
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार हे स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीतही तिन्ही पक्ष शक्य तेवढे वेगळे लढण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही सहा पक्षांमध्ये होण्याची चिन्हे आहेत.