पुणे : आगामी लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. त्याचवेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणांच्या निकालांबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे या सगळ्या घडामोडी चालू असताना दुसरीकडे राज्यातील जागावाटप व त्याअनुषंगाने कुठल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या असाच एक ‘हाय प्रोफाईल’ मतदारसंघ ठरलेल्या शिरूरबाबत अजित पवारांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? यावर सध्या तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आला आहे. ‘खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच’, असा निर्धार केलेल्या अजितदादांची भविष्यवाणी खरी ठरणार का, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, अजित पवारांनी या मतदारसंघावर दावा केला असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटानेही ही जागा लढविण्याची तयारी केल्याने शिरूरचा पेच कायम राहणार आहे.

Former Congress president Manikrao Thackeray criticizes Prime Minister Narendra Modi regarding insult to the Banjara community
यवतमाळ: पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बंजारा समाजाचा अपमान; माणिकराव ठाकरे यांची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
CM Eknath Shinde claims that there is no dissatisfaction in allocation of seats in mahayuti
महायुतीत जागा वाटपात नाराजी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
Badlapur candidature, fight in BJP, Badlapur,
बदलापुरात उमेदवारीवरून भाजपातच राडा, निरीक्षकांसमोरच यादीवरून कथोरे – पाटील गटात वाद
Jayant Patil Shivswarajya Yatra in the district excluding Rohit Pawar constituency
रोहित पवारांचा मतदारसंघ वगळून जयंत पाटील यांची जिल्ह्यात यात्रा; उभयतांमधील विसंवाद वाढला
Shrikant Shinde interaction with the people of Worli Vidhan Sabha print politics news
मनसेपाठोपाठ शिंदे गटही वरळीत सक्रिय; श्रीकांत शिंदे यांचा वरळीकरांशी संवाद
minister abdul sattar supporters protest agains raosaheb danve for pakistan remark on sillod
मंत्री सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या मतदारसंघात बहुसंख्य मतदार हे दोन्ही काँग्रेसला मानणारे असले, तरी शिवसेनाही कायम टक्कर देत आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी तर या मतदारसंघातून ‘हॅटट्रीक’ साधली आहे. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी ‘मी सांगेल तोच उमेदवार असेल’ असे जाहीर वक्तव्य केल्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्यापुढे कडवे आव्हान उभे राहणार आहे. आढळराव पाटील हे उमेदवार असणार हे निश्चत; पण ते अजित पवार गटाचे उमेदवार असणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, हाच औत्सुक्याचा विषय झाला आहे.

हेही वाचा – राजस्थानमधील भाजप सरकारला मोठा धक्का, मंत्रीच पराभूत

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार डॉ. कोल्हे यांच्यातील शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. पवार यांनी मी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असे जाहीर केले आहे. कोल्हे यांनीही अजित पवार यांना डिवचले आहे. खासगीतील कोणतीही चर्चा सार्वजनिक करणार नाही. मात्र, ‘बात निकली है तो दूर तक जाएगी…’ असे सांगत दिलेल्या आव्हानामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.

आढळराव पाटील कात्रीत?

भाजपच्या ‘मिशन १४४’ मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर हे दोन मतदारसंघ आहेत. मात्र, अजित पवार यांच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण झाली आहे. आढळराव पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत. मात्र, लोकसभेसाठी ते अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आढळराव पाटील हे कात्रीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून डॉ. कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या मतदारसंघात अजित पवार समर्थकांची ताकद असल्याने डॉ. कोल्हे यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.

आजवरचे यशापयश

या लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये फेररचना करण्यात आली. तोपर्यंत हा मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जात होता. शिरूर लोकसभा मतदारसंघ या नावाने २००९ मधील निवडणुका या पहिल्यांदा झाल्या. तोपर्यंत खेड लोकसभा या नावाने झालेल्या निवडणुकांमध्ये कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळत आले आहे. १९५७ मध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघात १९८४ पर्यंत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सलग काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या यशाची घोडदौड पहिल्यांदा जनता दलाचे किसनराव बाणखेले यांनी रोखली. बाणखेले यांनी जनता दलाच्या तिकिटावर या मतदारसंघातून विजय मिळविला होता. सलग दोनवेळा खासदार असलेले काँग्रेसचे रामकृष्ण मोरे यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या १९९१ आणि १९९६ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अनुक्रमे विदुला नवले आणि निवृत्ती शेरकर हे निवडून आले. १९९१ च्या निवडणुकीनंतर बाणखेले यांनी जनता दल सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या साध्या राहणीमानाचा मतदारांवर कायम प्रभाव राहिला. ‘धोतर, टोपी आणि पायात स्लीपर’ असा पेहेराव असलेल्या बाणखेले यांनी शिवसेनेची या मतदारसंघातील पायामुळं घट्ट रोवली. तत्पूर्वी जनता दलाच्या माध्यमातून ते मतदारांना परिचित होते. १९९६ मध्ये बाणखेले यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना निवृत्ती शेरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच्या १९९८ च्या निवडणुकीत शिवसेनेने बाणखेले यांच्याऐवजी नाना बलकवडे यांना उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसचे अशोक माहोळ यांनी विजय मिळविला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर १९९९ च्या निवडणुकीत मोहोळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यावेळी बाणखेले यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत अखिल भारतीय सेनेचा उमेदवार म्हणून अरुण गवळी याने या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, मोहोळ यांनी ५० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता. गवळीला साडेनऊ हजार मते पडली होती.

आढळराव पाटलांनंतर शिवसेनेचा कब्जा

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सक्रिय राजकारणात आल्यानंतर शिवसेनेने या मतदारसंघावर कब्जा मिळविला. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने त्यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्यांनी दोनवेळा खासदार राहिलेले अशोक मोहोळ यांचा पराभव करून दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांनी सलग तीनवेळा विजय मिळवित ‘हॅटट्रीक’ साधली. ही किमया या मतदारसंघात पूर्वी कोणत्याही उमेदवाराला साधता आलेली नाही. २००८ मध्ये या मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणुकांत त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत विलास लांडे या नावाचा आणखी एक उमेदवार उभा करण्यात आला होता. त्याला १४ हजार मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकांत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांचा तब्बल तीन लाख मतांनी पराभव केला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्यानंतर कोल्हे यांचा करिष्मा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फळाला आला आणि आढळराव पाटील यांचा पहिल्यांदा पराभव झाला.

हेही वाचा – मोदींच्या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांचा नवी मुंबईत एल्गार, दिघा स्थानक, पर्यावरणाच्या मुद्दयावरुन सरकारला घेरले

दोन्ही काँग्रेसची ताकद; पण यश शिवसेनेला

या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड- आळंदी, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या मतदारसंघात होतो. या विधानसभा मतदारसंघांमध्ये विखुरलेल्या स्थितीत शिवसेनेचा मतदार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. मात्र, आढळराव पाटील यांच्या लोकसंपर्कामुळे शिवसेनेला यश मिळत आले आहे.

२०१९ मधील निकाल

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) – मिळालेली मते ६,३५,८३०

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) – मिळालेली मते ५,७७,३४७