नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून त्यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्याकडे मंगळवारी दुपारी साडेचार वाजता भेटीसाठी वेळ मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘आप’च्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. या बैठकीमध्ये नव्या नेत्याची निवड केली जाईल. विधिमंडळ पक्षाचा नेता नायब राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे मुख्यमंत्रीपदाचा दावा करेल. त्यानंतर शपथविधी होऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला किमान एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो’, असे ‘आप’चे नेते व मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.

हेही वाचा : Arvind Kejriwal Resignation: दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, केजरीवाल राजीनामा देणार; आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय वादळ निर्माण केले. मुख्यमंत्रीपद दोन दिवसांत सोडण्याचा केजरीवालांचा निर्धार सोमवारीही कायम होता. केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी सोमवारी दिवसभर बैठकांच्या फेऱ्या सुरू होत्या. मनीष सिसोदिया, राघव चड्ढा, आतिशी आदी ‘आप’चे वरिष्ठ नेते व मंत्र्यांसोबत केजरीवाल यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीसंदर्भात सविस्तर चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर केजरीवालांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्याकडे मंगळवारच्या भेटीसाठी वेळ मागितली.

नवे मुख्यमंत्री कोण?

केजरीवाल मंगळवारी सक्सेना यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करतील. त्याआधी मंगळवारी सकाळी ‘आप’च्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. केजरीवालांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ‘आप’च्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल. माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव केजरीवाल यांनीच फेटाळल्यामुळे आतिशी, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, राघव चड्ढा, गोपाल राय यांच्या नावाची चर्चा होत आहे. याशिवाय केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडेही मुख्यमंत्रीपद सोपवले जाऊ शकते असे मानले जात आहे. मात्र केजरीवाल व ‘आप’च्या नेत्यांनी मौन बाळगले आहे.

मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही

दिल्ली विधानसभेची मुदत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपुष्टात येत असली तरी, केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबत नोव्हेंबरमध्ये दिल्ली विधानसभेचीही निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मात्र, केजरीवालांनी नव्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीचा निर्णय घेतला असून विधानसभा भंग करण्याची शिफारस केलेली नाही. शिवाय दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग व केंद्र सरकारच्या हाती असल्यामुळे केजरीवालांच्या मागणीवरून मुदतपूर्व निवडणूक घेतली जाण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : “जम्मू-काश्मीरमध्ये गांधी-अब्दुल्ला आणि भाजप यांच्यात थेट लढत”, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

काँग्रेसची ‘आप’वर टीका

राजकीय पक्षात सत्ताबदल होतो, नेतृत्व बदल होतो, तेव्हा राजकीय निर्णय घेतले जातात हे खरे. मोठा नेता कोण आणि जनतेमध्ये कोणाचा प्रभाव अधिक हे पाहून निर्णय होतात. आम आदमी पक्षात फक्त केजरीवाल आहेत, बाकीच्या नेत्यांना फारसे महत्त्व नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यामुळे ‘आप’मध्ये सत्तेचे हस्तांतर होत नाही. आम आदमी पार्टी ही एक व्यावसायिक कंपनी बनली आहे, एखाद्या व्यावसायिक कंपनीच्या शेअर्सचे हस्तांतर होते, तसेच ‘आप’मध्ये होत आहे, अशी टीका काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will arvind kejriwal resign today as he will meet governor in delhi print politics news css