INDIA Block : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. दरम्यान दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यात वाद टोकाला जाईल की काय अशी चिन्हं आहेत. कारण इंडिया आघाडीतले हे दोन पक्ष झुंजताना दिसत आहेत. अजय माकन आणि अरविंद केजरीवाल यांच्यातल्या वादाची फोडणी या सगळ्याला बसली आहे.
अजय माकन आणि केजरीवाल यांच्यात काय वाद झाला?
अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की अरविंद केजरीवाल राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे वादाचा भडका उडालेला दिसला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दिल्लीच्या युवक काँग्रेसने गुन्हाही नोंदवला. यामुळे काँग्रेसने अजय माकन यांच्याविरोधात २४ तासांत कारवाई करावी अशी मागणी आपने केली आहे. आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे की जर ही कारवाई झाली नाही तर काँग्रेसला इंडिया आघाडीच्या बाहेर काढा असं आम्ही इंडिया आघाडीच्या इतर घटक पक्षांना सांगू.
अजय माकन यांनी नेमके काय आरोप केले होते?
दिल्ली विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते. दरम्यान अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आमची ही चूक झाली की दिल्लीत आम्ही केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसची दिल्लीत दुर्दशा झाली. मात्र अजय माकन यांचं हे म्हणणं आपला मुळीच पटलं नाही. तसंच अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख अजय माकन यांनी फर्जीवाल असा केला. त्यानंतर आपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माकन एवढंही म्हणून गेले की अरविंद केजरीवाल हे राष्ट्रद्रोही आहेत. त्यांच्या कुठलीही विचारधारा नाही त्यांच्याकडे फक्त पदाची महत्त्वाकांक्षा आहे.
आपने आरोप काय केला?
आप आणि काँग्रेस यांच्यात वादाची ही पेटती भट्टी निर्माण झाल्याने इंडिया आघाडी फुटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. आपला हरवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे असाही आरोप आपने केला.
दिल्लीत काँग्रेसचं राजकारण कसं सुरु आहे?
दिल्लीत मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. तेव्हापासूनच दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी अरविंद केजरीवालांना टार्गेट केल्याचं दिसून येतं आहे. दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत आप ला जबरदस्त मताधिक्य मिळालं होतं. २०१३ मध्ये दिल्लीत काँग्रेसला २४. ६७ टक्के मतं मिळाली होती. २०२० हे प्रमाण ४.६३ टक्के अशा मतांवर आलं. आता काँग्रेसला इथली सत्ता हवी आहे. त्या दृष्टीने अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यात येतं आहे. मात्र अजय माकन आणि आप यांच्यातला वाद शिगेला गेला आहे. त्यामुळे नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.