गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत: स्वीकारल्याने जिल्ह्यात कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण होण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांचीही सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही इच्छुक होते.
आदिवासीबहुल अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून लोह प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामुळे अनेक मोठ्या कंपन्या याठिकाणी मोठी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडूनही विशेष प्रयत्न केल्यात जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम गावांना भेटी देऊन विविध विकासकामांचे लोकार्पण केले. कोनसरी येथील लोह प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे देखील उद्घाटन केले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी गडचिरोलीला देशाची ‘स्टील सिटी’ बनवून राज्यातील शेवटचा नव्हे तर पाहिला जिल्हा म्हणून ओळख मिळवून देऊ, अशी घोषणाही केली होती.
आणखी वाचा-यवतमाळात शिवसेनाच मोठा भाऊ; नाईक बंगल्याचा अपेक्षाभंग
मागील पाच वर्षापासून ते सातत्याने गडचिरोलीतील उद्योगासंदर्भात आढावा घेत आहेत. त्यामुळे त्यांची पालकमंत्री म्हणून झालेल्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोहखनिज आणि त्यावर आधारित उद्योगांव्यतिरिक्त नक्षलवाद, दुर्गम भागातील पायाभूत सुविधा, सिंचन प्रकल्पांचे रखडलेले कार्य, रेल्वे मार्ग आणि अपुरी आरोग्य सुविधा याविषयी प्रशासन स्तरावर असलेली अनास्था फडणवीस यांच्या नियुक्तीमुळे दूर होणार, अशी अशा व्यक्त होत आहे. सोबतच वन उपजावरआधारित उद्योगाला देखील चालना मिळावी, अशीही मागणी होत आहे. गेल्या काही वर्षातील पोलीस विभागाने केलेल्या कारवायांमुळे जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे अनेक दुर्गम गावे मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यामुळे प्रस्तावित विकास कामांच्या विस्तारात खाणीसह सामान्य नागरिक नागरिकांना देखील केंद्र स्थानी ठेवावे, अशी अपेक्षा विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा-वाशीम जिल्ह्याचे पालकत्व ६३० कि.मी.वर
‘सहपालकमंत्री’मुळे संभ्रम
राज्यात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांसोबत सहपालकमंत्री अशीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये देखील संभ्रम दिसून येत आहे. अशा प्रकारच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील बाहेरील हस्तक्षेप वाढणार, अशी भीती व्यक्त होत आहे.