कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेचा एक मतदारसंघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी असली तरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताज्या दौऱ्यात दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांचीच पालखी वाहावी लागणार असल्याचे दिसून आले. भाजपला एखादा तरी मतदार संघ मिळेल असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले नाही. लोकसभेला महाडिक परिवाराला उमेदवारी आणि समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राहण्याच्या त्यांच्या भूमिकेने आशा पल्लवीत झाल्या. अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे स्नेहभोजन झाले तरी पक्षप्रवेशाचा मुद्दा लटकला आहे. तर तिकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर नाराजीला तोंड फोडले असून त्यांना शांत करण्याची जबाबदारी माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्याची चतुराई लक्षवेधी ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर जिल्ह्यासाठी बावनकुळे यांनी दोन दिवसांचा पुरेसा अवधी दिला. इचलकरंजी तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर शहर येथे लोकांशी संवाद साधला. भाजपच्या योद्ध्याशी हितगुज केले. भाजप, नरेंद्र मोदी यांना मिळणारा प्रतिसाद पाहता राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा मिळेल याचा पुनर्विचार त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील एक मतदारसंघ भाजपला मिळावा असा ठराव केला आहे. भाजपकडे कोणता मतदारसंघ येणार या प्रश्नावर बावनकुळे यांनी पक्षाच्या संसदीय समितीकडे बोट दाखवले. ही भूमिका पाहता भाजपला पुन्हा एकदा जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नाही म्हणायला महाडिक परिवाराला उमेदवारी देण्याचे संकेत त्यांनी दिले खरे; पण लोकसभेची उमेदवारी द्यायची, तर महिला आरक्षणाची संख्या वाढल्यावर विधानसभेसाठी उमेदवार कोण? असा पुढचा प्रश्न स्वतःच उपस्थित करीत बावनकुळे यांनी स्वतःच उमेदवारीचा मुद्दा झुलवत ठेवला.

हेही वाचा – ‘भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर जनेतला पश्चाताप व्यक्त करावा लागेल’, केरळच्या मुख्यमंत्र्यांची टीका

घाटगेंना दिलासा

राज्याच्या सत्तेमध्ये अजित पवार आले असताना कागलचे हसन मुश्रीफ यांनी सोबत करीत वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद मिळवले. याचवेळी कागलमध्ये पुन्हा एकदा मुश्रीफ आणि भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यात आखाडा रंगू लागला आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ विद्यमान आमदार या नात्याने मुश्रीफ यांच्याकडे जाणार असेल तर घाटगे यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरणार का असा प्रश्न पुढे आला आहे. या मतदारसंघातील गडहिंगलज येथील कार्यक्रमावेळी बावनकुळे यांनी जे कार्यकर्त्यांच्या मनात ते माझ्या मनात, असे म्हणत पक्ष घाटगे यांच्या बाजूने राहणार असल्याचे उघडपणे स्पष्ट केले आहे. हा घाटगे यांना दिलासा ठरला असला तरी त्यांना तेथील जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडावी लागणार आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असे बावनकुळे यांनी गेल्या दौऱ्यात सांगितले होते. तेव्हा सातारा जिल्ह्यातील अनेकांनी प्रवेश केला होता. यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात प्रभावी कोणी पक्षात प्रवेश केला नाही. माजी मंत्री, इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजप प्रवेश कधी होणार या प्रतीक्षेत कधीपासून आहेत. बावनकुळे यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले. प्रदेशाध्यक्षांनी डिनर डिप्लोमसी राजनीतीचे दर्शन घडवले. खाजगीत चर्चा करताना बावनकुळे यांनी ताराराणी आघाडी सोडा आणि भाजपमध्ये या असे आवतन दिले. प्रत्यक्षात आवाडे यांच्या हाती अधिकृतपणे कमळ कधी येणार या प्रश्नावरही बावनकुळे यांनी थेट भाष्य केले नाही.

हेही वाचा – महाविकास आघाडीची मते फोडण्यासाठी भाजपकडून तिसऱ्या आघाडीला बळ?

निष्ठावंतांचा निग्रह

प्रदेश अध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये सन्मान द्यावा अन्यथा वेगळा विचार करण्याचा इरादा बोलून दाखवला होता. तापलेले वारे लक्षात घेऊन बावनकुळे यांनी जुन्या कार्यकर्त्यांची आवर्जून भेट घेतली. माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई, माजी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा यांनी भाजपची पक्षीय संरचना माहीत नसणाऱ्यांकडून पक्ष बांधणी कशी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला. नवख्यांना पदे आणि निष्ठावंत बाजूला सारण्याचा प्रयत्न पक्षाला खड्यात घालणारा आहे, अशा शब्दात तीव्र नाराजी केली. काय योगायोग, निष्ठावंतांनी ज्यांच्या कार्यशैलीवर कोरडे ओढले. बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्यातील नाराजी दूर करण्यासाठी लक्ष घालण्यास सांगितले. ज्यांच्याविषयी तक्रार तेच निष्ठावंतांची नाराजी कशी दूर करणार याचे कुतूहल असणार आहे. आमच्या भूमिकेला न्याय मिळणार नसेल तर वेगळा विचार करण्याचा निग्रह या बैठकीनंतर कायम राहिला. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात कालपरवा आलेल्या नेत्यांजवळ नवे पदाधिकारी अंतरावर हे चित्र ठळकपणे दिसत असताना दुसरीकडे जुन्या कार्यकर्त्यांची नाराजांच्या उरीचे शल्य कायम राहिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will bjp get kolhapur district lok sabha seats or only allies will get it print politics news ssb
Show comments