लोकसभेत कमी जागा स्वीकारल्या असल्या तरी पियूष गोयल यांच्या निवडीमुळे रिक्त होणारी राज्यसभेची जागा देण्याचा शब्द भाजपने दिल्याचा दावा अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. त्यानुसार राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत अजित पवार गटासाठी भाजप सोडणार का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पियूष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार ३ सप्टेंबरला दोन जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होईल. म्हणजे प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होते. महायुतीकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येऊ शकतात. महायुतीला २०० पेक्षा आमदारांचा पाठिंबा आहे.
हेही वाचा >>>बांगलादेशी हिंदू, सीएए कायदा आणि राजकीय पक्षांची भूमिका; पश्चिम बंगालचं राजकारण कसं तापलंय?
राज्यसभेच्या या दोन जागांसाठी भाजप, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटातील शेकडो जणांचा डोळा आहे. यामुळेच भाजपचे दिल्लीतील नेतृत्व कोणता निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फक्त चारच जागा सोडण्यात आल्या होत्या. पियूष गोयल हे लोकसभेवर निवडून आल्यावर त्यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला देण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. भाजपच्या वतीने तसे कोणी असे काही आश्वासन दिल्याबद्दल काहीच स्पष्ट केलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजप गोयल यांची राज्यसभेची जागा अजित पवार गटासाठी सोडणार का, असा प्रश्न आहे. गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेची मुदत ही जुलै २०२८ पर्यंत आहे. तर उदयनराजे भोसले यांच्या रिक्त झालेल्या जागेची मुदत ही एप्रिल २०२६ पर्यंत आहे. यामुळेच गोयल यांची रिक्त झालेली जागा मिळावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.
हेही वाचा >>>खतगावकर तुतारी फुंकणार?
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा फारसा प्रभाव पडला नाही. सुनील तटकरे हे पक्षाचे एकमेव खासदार निवडून आले. अजित पवार यांच्या पत्नीचा बारामतीमध्ये पराभव झाला. राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. याबद्दल रा. स्व. संघाशी विचारांच्या नियतकालिकांमधून अजित पवार यांच्यावर खापर फोडण्यात आले. अजित पवार यांच्याशी युती करण्यात चूक झाल्याचा एकूणच सूर होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेली युती ही नैसर्गिक होती. पण अजित पवारांना बरोबर घेण्याची खेळी भाजपच्या पारंपारिक मतदारांनाही रुचलेली नाही. यामुळेच राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला भाजप सोडणार का, याची खरी उत्सुकता आहे. राष्ट्रवादीमध्ये राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ इच्छूक आहेत. तर साताऱ्याला राज्यसभा देण्याचा शब्द अजित पवार या वेळी तरी पूर्ण करतात का, याकडे साताऱ्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन मंत्री हे लोकसभा वा राज्यसभेचे सदस्य नाहीत. त्यांना निवडून आणण्यात भाजपचे प्राधान्यक्रम असेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दावा केल्याप्रमाणे एक जागा भाजपने राष्ट्रवादीला सोडल्यास आणखी एक जागा भाजपला मिळू शकते. या जागेवरही अनेकांचा डोळा आहे. लोकसभेत पराभूत झालेल्या नवनीत राणा, रावसाहेब दानवे, रणजितसिंह निंबाळकर आदींचा खासदारकीसाठी प्रयत्न आहे. परभणीतून पराभूत झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनाही राज्यसभा हवी आहे. भाजपचे दिल्लीतील नेतृत्व दोन्ही जागांबाबत निर्णय घेणार आहे.