मुंबई : मराठवाड्यात लागोपाठ दोन जाहीर सभा घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या ‘रयतूबंधू’ आणि ‘दलितबंधू’ या योजनांचे राज्यातील शेतकरी आणि अनुसूचित जातीच्या लोकांना प्रलोभन दाखवत आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेलंगणाच्या पक्षाला राज्यातील मतदार स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याची धोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या योजनेवर टीका करताना ही शेतकऱ्यांसाठी भीक असल्याची टीका केली. तेलंगणा सरकार शेतकऱ्यांची कशी काळजी घेते याचाही त्यांनी दाखला दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणातील पंचसूत्रीचे प्रारूप लागू केले आणि दलितबंधूंना १० लाख रुपये देण्याची योजना लागू केली तर आपण येथे येणे बंद करू, असे आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिले.
हेही वाचा – सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला टोचले आणि भाजपला दिले प्रत्युत्तर
भारत राष्ट्र समितीला तेलंगणाच्या बाहेर पक्षविस्तार करायचा आहे. यासाठी तेलंगणाच्या शेजारील महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात आले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्यांची पहिली सभा नांदेडमध्ये झाली होती. यापाठोपाठ दुसरी सभा नांदेड जिल्ह्यातीलच लोहा येथे झाली. दोन सभांमधून त्यांनी शेतकऱ्यांना आपलेसे करण्यावर भर दिला. रविवारी लोह्यात झालेल्या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.