ठाणे : नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते विकास महामंडळ यासारखे शहरी पट्टयावर प्रभाव राखू शकतील अशी मंत्रीपदे स्वत:कडे राखण्यात यशस्वी ठरलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा गृह जिल्हा असणाऱ्या ठाण्याचे पालकमंत्री पद राखण्यात यश मिळते का याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपची साथ धरत महायुतीत सहभागी झालेले अजित पवार यांनी दोन वर्षांपुर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वत:कडे राखले होते. उपमुख्यमंत्री पदासोबत पुण्याचे पालकमंत्री पद पटकावत या भागातील राजकारणावर वरचष्मा राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहीला होता. शिंदे यापुढे पवारांचा कित्ता गिरवतात का याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद

राज्य मंत्रीमंडळात महत्वाचे विभाग मिळवत शिंदे यांनी भाजपसोबत केलेल्या वाटाघाटीत काही प्रमाणात का होईना यश मिळवले आहे. राज्याचे नगरविकास विभागाचे मंत्रीपद मिळवताना गृहनिर्माण विभागही पदरात पाडून घेत शहरी पट्टयावर प्रभाव राहील अशा पद्धतीची आखणी शिंदे यांच्या गोटात झाल्याचे पहायला मिळत आहे. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना मुंबई महानगर विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ यासारख्या प्राधिकरणांच्या अखत्यारित ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील हजारो एकर जमिनीच्या विकासाचे अधिकार सोपविण्यात आले आहेत. सिडकोसारख्या शासकीय मंडळाकडे ठाणे आणि आसपासच्या प्रदेशातील शहरांमधील बेकायदा वस्त्यांच्या समूह विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रस्ते विकास महामंडळाला महाबळेश्वर, कोकण पट्टयातही नियोजनाचे अधिकार सोपवून शिंदे यांनी आपल्या राजकीय महत्वकांक्षा यापुर्वीच स्पष्ट केल्या आहेत. नव्या सरकारमध्ये हे विभाग शिंदे पुन्हा एकदा स्वत:कडे राखण्यात यशस्वी ठरले असले तरी एमएमआरडीए, एमएसआरडीसी यासारख्या विभागांकडून नवनगरांचा होत असलेल्या या विकासाच्या प्रारुपाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आगामी काळातील भूमीकाही महत्वाची ठरणार आहे.

ठाणे पालकमंत्री पद प्रतिष्ठेचे

मुंबई महानगर प्रदेशाचे केंद्रस्थान असलेला ठाणे जिल्हा यापुढील काळातही राजकीय आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या केंद्रस्थानी रहाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्रतिष्ठेचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांचे विश्वासू मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपविले होते. शिंदे पिता-पुत्रांचा जिल्ह्यावर पुर्ण प्रभाव असल्याने देसाई यांचे पालकमंत्री पद नामधारी ठरले होते. भाजपने यंदाच्या मंत्री मंडळात ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक या एकमेव चेहऱ्याला संधी दिली आहे. नाईक यांनी १३ वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले आहे. जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिंदे आणि नाईक यांच्या फारसे राजकीय सख्य कधीच दिसले नाही. या परिस्थितीत नव्या रचनेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद राखण्यात शिंदे यशस्वी ठरतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री पद राखण्यात शिंदे यशस्वी ठरले तर ते स्वत:कडे हे पद ठेवतात का याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.

आणखी वाचा-ज्येष्ठ मंत्र्यांना धक्का! महाजन, विखे-पाटील, मुंडे यांचे पंख छाटले

जिल्ह्यात शिंदेना भाजपच प्रतिस्पर्धी

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या वर्षात होण्याची शक्यता असून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईदर यासारख्या शहरांमध्ये शिंदे यांच्या पक्षाला भाजपकडूनच आव्हान उभे राहील अशी शक्यता अधिक आहे. नवी मुंबईत नाईक आणि शिंदे समर्थकांमध्ये सख्य नाही. कल्याण पट्टीत खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या स्पर्धा आहेच. ठाण्यात भाजप शिंदे यांच्या प्रभावापुढे पक्ष वाढीसाठी धडपडतो आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या प्रमाणे गृह जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वत:कडे राखून ठेवत शिंदे राजकीय प्रभाव कायम राखण्याचा प्रयत्न करु शकतील असा त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will deputy chief minister eknath shinde succeed in retaining post of guardian minister of thane print politics news mrj