-भगवान मंडलिक
एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आल्यामुळे नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाच्या वाट्याला येणार याविषयी सध्या तर्कवितर्कांना ऊत आला आहे. ज्येष्ठतेचा निकष ठरविल्यास गणेश नाईक हे पालकमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. असे असले तरी भाजपच्या धक्कातंत्राची रणनीती आणि मुख्यमंत्र्यांचा अपेक्षित आग्रह लक्षात घेता नाईकांना यंदा ही संधी मिळेल का याविषयी त्यांच्या समर्थकांच्या गोटातच साशंकता आहे. दुसरीकडे डोंबिवलीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना यंदा कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळण्याची दाट शक्यता असून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असलेल्या चव्हाणांना पालकमंत्रीपदाची लॉटरी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची दाट चिन्हे –
गेल्या अडीच वर्षांच्या काळात डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण विकास कामे, शासनाकडून येणार निधी विषयावरून एकनाथ शिंदे यांना सातत्याने लक्ष्य करताना दिसत होते. चव्हाण आणि शिंदेपुत्र खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्यातील मतभेद टोकाला पोहचले होते. कोपर पुलाच्या उद्धाटन सोहळ्यात आमदार चव्हाण आणि खासदार शिंदे यांच्यातील कलगीतुरा भलताच गाजला. असे असले तरी शिंदे गटाच्या बंड मोहिमेत चव्हाण यांनी बिनिचा शिलेदार म्हणून काम पाहिले. देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण यांच्यातील सख्य जगजाहीर आहे. भाजपच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असतानाही रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चव्हाण यांच्याकडे होते. यंदा बदलेल्या राजकीय समीकरणातही चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची दाट चिन्हे असून शिंदे-फडणवीस यांचे लाडके असल्याने त्यांच्याकडे पालकमंत्री पदही सोपविले जाईल असे बोलले जात आहे.
नाईकांना यंदा ही संधी मिळेल का याविषयी साशंकता –
ज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना गणेश नाईक यांच्याकडे सलग १० वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. तेव्हा पालघर जिल्हाही ठाण्याचा भाग होता. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद सलग १० वर्षे भूषविण्याचा मान नाईक यांना मिळाला आहे. नाईक आणि शिंदे यांच्या टोकाची कटुता नसली तरी फारसे सख्यही पाहायला मिळालेले नाही. ज्येष्ठतेच्या निकषावर नाईकांना मंत्रिमंडळात स्थान आणि पालकमंत्रीपद असे दोन्ही मिळणे अपेक्षित आहे. मात्र भाजपचे धक्कातंत्राचे राजकारण आणि शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे बदललेली राजकीय गणिते पाहाता नाईकांना यंदा ही संधी मिळेल का याविषयी साशंकता आहे. अशीच परिस्थिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या बाबतीत आहे. कथोरे ज्येष्ठ असले तरी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये अलीकडेच दाखल झाले आहेत. शिवाय कथोरे यांची काम करण्याची पद्धत अधिक थेट आणि आक्रमक मानली जाते. मुख्यमंत्री शिंदे यांना नाईक आणि कथोरे या दोघांची कार्यशैली फारशी पचेल अशी चिन्हे नाहीत. तुलनेने रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये असले तरी शिंदेशाहीसोबत नेहमीच जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे नाईक-कथोरे यांच्या तुलनेत चव्हाण बरे असा विचार शिंदे यांच्या गोटातही होऊ शकतो. शिवाय रवींद्र चव्हाण हे शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील असल्याने चव्हाण यांचा मोठा उपयोग श्रीकांत यांचा लोकसभा मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी होणार आहे.
मंत्री पदासाठी देखील शर्यत मोठी –
ठाणे जिल्ह्यातून आ. किसन कथोरे, आ. गणेश नाईक, आ. प्रताप सरनाईक, आ. बालाजी किणीकर, आ. संजय केळकर, आ. गणपत गायकवाड यांची नावे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. परंतु ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री असल्याने जिल्ह्यात सर्वच मानाची मंत्रिपदे दिली तर इतर जिल्ह्यातून, बंडखोर गटाकडून उठाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आ. चव्हाण यांना मंत्रिमळात प्रथम प्राधान्य देऊन त्यांना पालकमंत्री पद देण्याच्या हालचाली आहेत. आ. कथोरे, आ. नाईक यांच्या ज्येष्ठतेचा विचार करून आ. नाईक यांना मंत्रिपद, आ. कथोरे यांना त्यांच्या आवडीच्या महामंडळावर नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. संयमित स्वभावाचे आ. केळकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे अशी जोरदार मागणी त्यांच्या कार्यकर्ते, ठाणेकरांची आहे. राज्य सत्तेमधील एकूण धक्कातंत्र पाहता त्यांना किती स्थान मिळेल याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मागील भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाचे दावेदार असलेले आ. कथोरे यांना त्यावेळी डावलण्यात आले होते. आपल्या सामर्थ्यावर निवडून येऊन मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावणाऱ्या कथोरे यांना मंत्रिपद देण्यात आले नाही तर ते नाराज होण्याची शक्यता आहे. आ. गणपत गायकवाड, फुटीर आ. डाॅ. किणीकर आ. सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. ही गणिते जुळवून ठाणे जिल्ह्याचा मनसबदार कोण याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.