आम आदमी पक्षाने विरोधकांच्या आघाडीत प्रवेश केल्यापासून काँग्रेसशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली सरकारविरोधात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात काँग्रेसने ‘आप’ पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या राजकीय मैत्रीचा पुढचा अंक गुजरातमधून पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे गुजरात अध्यक्ष इसूदान गढवी यांनी सोमवारी (७ ऑगस्ट) रोजी जाहीर केले की, ते काँग्रेससह पुढील लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. यासाठी लवकरच जागावाटपाबाबत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना गढवी म्हणाले, “विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी गुजरातमध्येही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल. सध्या आम्ही सर्वच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. भाजपाने ‘इंडिया’चा धसका घेतला आहे. त्यामुळेच पंतप्रधानांपासून ते राज्यामधील अनेक भाजपा नेते विरोधकांच्या आघाडीवर टीका करत आहेत”. गढवी पुढे म्हणाले की, जर दोन्ही पक्षांनी जागावाटपात योग्य समन्वय ठेवून जागा लढविल्या तर आम्ही राज्यातील सर्व २६ जागांवर विजय मिळू शकतो. आम आदमी पक्षाचे गुजरातमधील प्रवक्ते करण बारोट म्हणाले की, आप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांची ताकद पाहून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. भाजपाला हरविण्यासाठी कोणत्या पक्षाकडे जागा दिली जावी, यावर आमची चर्चा होणार आहे.

हे वाचा >> ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?

दरम्यान काँग्रेसने मात्र अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर याबाबतचा अंतिम निर्णय सोपविण्यात आला आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आताच आघाडीबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल. आगामी निवडणुकीबाबत आघाडी करण्याचा अंतिम निर्णय ‘इंडिया’ आघाडीतील नेते एकत्र येऊन घेतील. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी पीटीआयशी बोलताना म्हणाले, “मला आताच त्यांच्या (गुजरात ‘आप’) घोषणेबाबत समजले. आमच्याकडे इतर पक्षाशी जागा वाटपाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेत असते. आता त्यांना निवडणुकीपूर्वी कुणासोबत आघाडी करायची असेल तर हा त्यांचा विशेषाधिकार आहे.”

तर दुसरीकडे गुजरात भाजपाचे प्रवक्ते रुतविज पटेल यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भाजपाने मागच्या दोन निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. आता २०२४ च्या निवडणुकीत आम्ही आणखी जास्त मताधिक्याने सर्व जागा जिंकू. जेव्हापासून आप पक्षाचा उदय झाला, तेव्हापासून आम्ही सांगत होतो की, हे काँग्रेसची बी टीम आहेत. आता ‘आप’ने निवडणुकीआधी आघाडी जाहीर करून आमचा आरोप सत्य असल्याचे सिद्ध केले आहे.”

आणखी वाचा >> विरोधकांची आघाडी ‘स्वार्थासाठी’, लोक त्यांचा अजूनही द्वेष करतात; पंतप्रधान मोदींनी खासदारांना दिला कानमंत्र

आम्ही मागच्या दोन निवडणुकांपासून सर्वच्या सर्व २६ जागा जिंकल्या आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी आम्हाला सर्वच्या सर्व जागा पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे लक्ष्य दिले आहे. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले आहे की, विरोधकांनी कितीही पक्षांची आघाडी केली तर नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा मोठ्या बहुमतासह पंतप्रधान बनतील, असेही रुतविज पटेल यांनी सांगितले.

डिसेंबर २०२२ रोजी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी काँग्रेस आणि ‘आप’ने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली. ज्यामध्ये १८२ सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेसला १७, तर ‘आप’ला पाच जागांवर विजय मिळवण्यात यश आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will fight 2024 lok sabha polls jointly in gujarat says aap congress waits central leadership directions kvg
Show comments