चंद्रशेखर बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर असलेल्या रिपाइंच्या अनेक गटांपैकी पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक गट असून प्रा. जोगेंद्र कवाडे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. एक लढाऊ नेता अशी प्रा.जोंगेंद्र कवाडे यांची ओळख असली तरी त्यांच्या पक्षाचा राज्यातील दलित मतांवर मर्यादित प्रभाव लक्षात घेता कवाडे-शिंदे युतीमुळे राजकीय समीकरणावर फार फरक पडेल, अशी शक्यता नाही. काँग्रेसबरोबर आघाडीत कवाडे यांच्या पक्षाची फारशी प्रगती झाली नाही. आता शिंदे गटाबरोबर गेल्याने काही फरक पडेल, असे आशादायक चित्र दिसत नाही.

महाराष्ट्रात दलित मतांची संख्या लक्षात घेता रिपाईच्या विविध गटांना सोबत घेउन निवडणुका लढवल्या जातात. मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ एकत्र येण्याचा नारा दिवंगत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. आता त्यांच्याच एका शिष्याने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच फूट पाडून शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करण्यासाठी कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाशी युती केली. त्यामुळे कवाडे यांचा पक्ष आणि त्याचा राज्यातील दलित जनतेवर असलेला प्रभाव याबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा… किरीट सोमय्या यांची भविष्यवाणी अन् ‘ईडी’ची कारवाई

हेही वाचा… रायगडमध्ये पालकमंत्र्यांच्या खात्याच्याच पदरी निराशा

कवाडे यांच्या विषयी दलितांमध्ये आदरांची भावना आहे. विद्यार्थी दशेपासून दलितांच्या हक्कासाठी लढणारा, १९७६ मध्ये बौद्धांच्या सवलतीसाठी कारावास भोगणाराआणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरुणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी-नागपूरते औरंगाबादपर्यंत ‘लॉंगमार्च’ काढणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटांपैकी एक त्यांचाही रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) हा गट दलित राजकारणात अस्तित्व राखून होता. १९८५-९० च्या दशकात देशाच्या राजकारणात हिंदुत्ववादी विचाराचा प्रभाव वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठी सर्व रिपाइ गटांनी एकत्र यावे म्हणून दबाव वाढला. त्यामुळे रिपाइंचे सर्व गट एकत्र आले. त्यात कवाडे यांच्या गटाचाही समावेश होता. एकीकृत रिपब्लिकन पक्षाने काँग्रेस सोबत युतीकरून राज्यात १९९८ मध्ये लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यात रिपाइंचे चार खासदार निवडून आले. त्यात चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर कवाडे निवडून आले होते. थेट लोकांमधून निवडून येण्याची ही कवाडे यांची ही पहिली वेळ होती. त्यानंतर रिपाइंमध्ये पुन्हा फूट पडली. सन २००० मध्ये कवाडे यांनी पिपल्स रिपब्लिकन पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. कधी स्वतंत्रपणे तर कधी काँग्रेससोबत युती करून कवाडे यांच्या पक्षाने निवडणुका लढल्या. मात्र त्यांच्या पक्षाला यश मिळाले नाही. २०१४ मध्ये ते काँग्रेससोबत गेले. त्यामुळे काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. २०१९ मध्येही त्यांनी काँग्रेससोबत युती केली होती, महाविकास आघाडीचे ते घटक होते. काँग्रेसने त्यांच्यासाठी राज्यात सहा जागा सोडल्या होत्या. त्यापैकी एकाही जागेवर कवाडे यांचा पक्ष विजयी होऊ शकला नाही. वढेच काय तर राज्यात एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या पक्षाचा सदस्य नाही. ते राहात असलेल्या नागपूरमधील महापालिकेत व जिल्हा परिषदेत सुद्धा हीच स्थिती आहे. राजकारणात दबाव गट तयार करण्यासाठी संघटना मजबूत असावी लागते. याच माध्यमातून निवडणुकीतील यश साध्य होते. कवाडे यांचा पक्ष या पातळीवर कमी पडला आहे. त्यामुळे शिंदे-कवाडे यांचा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग राजकीय शक्तीच्या अभावामुळे परिणामकारक ठरण्याची शक्यता धुसर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will joining hands with eknath shinde will benefit jogendra kawade peoples republican party of india print politics news asj