छत्रपती संभाजीनगर : मराठा जातीचे वर्चस्व असणाऱ्या ८० मतदारसंघ आणि आरक्षित ५४ पैकी ३६ मतदारसंघात गणित जुळवून आणून ‘मराठा शक्ती’ चा जरांगेंचा प्रयोग निवडणूक निकालानंतरच्या जुळवाजुळव लक्षात घेऊन मांडला जात असल्याचे ‘नेते’ मनोज जरांगे यांच्या भाषणानंतर स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायाचे याचा निर्णय घेण्याच्या बैठकीत निवडून आणायचे आणि पाडायचे हे दोन्ही सूत्र वापरताना ‘आरक्षित’ मतदारसंघावरही लक्ष केद्रीत केले असल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा पूर्ण रोख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जरांगे यांनी शब्दानेही उल्लेख केला नाही. राजकारणात उतरायचे की नाही या महत्त्वपूर्ण बैठकीमध्येही जरांगे यांनी एकही शब्द उच्चारला नाही. राजकारणाच्या पटलावर मराठा शक्तीकडून ‘वजा फडणवीस’ हे सूत्र असेल हा संदेश मात्र त्यांनी प्रामुख्याने व्यक्त केला.

आणखी वाचा-अमरावती जिल्‍ह्यात काँग्रेसच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्‍ये चढाओढ

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात ‘जरांगे प्रभाव’ कायम राहील, असे मानले जात होते. या मतदारसंघांपैकी किती मतदारसंघात जरांगे त्यांचे अपक्ष उमेदवार उभे करतात, यावर राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. जरांगे यांनी त्यांच्या भाषणात ‘मुस्लिम आरक्षणा’चाही उल्लेख केला. दलित मतदारसंघात एक लाख मतदान असणाऱ्या ३६ मतदारसंघात मागण्या मान्य असणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देऊ असे जाहीर केल्याने ‘मराठा – मुस्लिम – दलित’ हा लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशाचे सूत्र ‘मराठा शक्ती’ च्या मागे उभा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

‘उमेदवार दिले तर भाजप आनंद होईल आणि नाही दिले तर महाविकास आघाडीला’ हे सूत्र जरांगे यांनी मराठा समाजाच्या बैठकीत स्वत:च सांगितले. त्यातून मार्ग काढण्यासाठी निवडून येणाऱ्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे असे ठरविण्यात आले. या जागा किती याची चर्चा आणि अभ्यास मांडणारे मांडताना त्यांनीच या पूर्वीच्या भाषणात १०० हून अधिक जागांचा उल्लेख केला होता. त्यांच्या या नव्या घोषणांमुळे राज्यातील २८८ पैकी १२० जागांवर ‘जरांगे प्रभाव’ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, असे सांगण्यात येत आहे. गावोगावी कीर्तन करणाऱ्या काही मंडळींनी मराठा समाजला मदत करणाऱ्यांमध्ये मुस्लिम समाज आहे. त्यांना विसरता येणार नाही, असा प्रचार करायला सुरुवात केली होती. मात्र, आपण ‘ कट्टर हिंदूच’ आहे. भाजपही वाईट नाही. पण तो पक्ष चालविणारा नीट नाही, अशी टीका फडणवीस यांच्यावर केली. राजकीय पटलावर ‘ फडणवीस विरोध’ कायम राहील, याचे स्पष्ट संकेत त्यांनी आपल्या समर्थकांना दिले.

आणखी वाचा-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना आमदारकीचे वेध

जरांगे यांचा राजकीय पटलावर ‘मराठा शक्ती’ उभी करण्याचा प्रयत्न फसला तर हसे होऊ शकते, याचेही भान असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले. आंदोलन कायम राहील आणि पुढील ४० दिवस राजकारण करू, असेही स्पष्ट केल्याने आरक्षण आंदोलनाचे नेते ते राजकीय नेते, असा जरांगे यांचा ६६ दिवसाच्या उपोषणासह १३ महिन्यातील प्रवास महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता

जरांगे यांचा प्रभाव असणाऱ्या मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात सर्वपक्षीय मराठा आमदारांची संख्या २४ एवढी आहे. यातील सर्वाधिक आमदार भाजपमध्ये आहेत. एकूण १६ आमदारांपैकी १० आमदार मराठा आहेत. त्यामुळे या मतदारसंघात जरांगे उमेदवार देणार का, त्या उमदेवाराची ताकद किती असेल, यावर बरीच गणिते ठरतील. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतांचा टक्का काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाकडे सरकल्याने मराठवाड्यात महायुतीचे एकमेव खासदार निवडून आले. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे निवडून आले. त्यांनाही ‘मराठा’ मतांचा लाभ झाला. भाजपचे सर्व उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीमध्ये सारे काही जरांगे यांच्या मदतीने पुढे जाईल असे मानले होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर मनोज जरांगे यांची आंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली होती. जरांगे यांच्या ‘मराठा शक्ती’ प्रयोगामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील मराठा नेत्यांसमोर प्रचार मुद्दयांचे नवे प्रश्न उभे ठाकतील. त्यामुळे उमेदवार उभे करण्याचा महाविकास आघाडीला फटका बसेल असे मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will mahavikas aghadi hit by maratha shakti experiment in 120 constituencies in assembly election print politics news mrj