छत्रपती संभाजीनगर: तुलनेने कमी दुष्काळाच्या झळा जाणवणाऱ्या गोदाकाठच्या गावातून मराठा आरक्षण मागणीला मिळालेले पाठबळ आणि त्यानिमित्ताने झालेले मराठा जातीचे एकत्रिकरण राजकीय पटलावर नक्की कोणाच्या बाजूला वळेल, यावरून आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीही राज्यभर निघालेल्या मोर्चानंतरही भाजप विरोधी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र रंगविले जात होते. प्रत्यक्षात भाजपला यश मिळाले. या वेळी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरक्षण आंदोलनादरम्यान ज्या माजलगाव येथे प्रकाश साेळंके यांच्या घरावर हल्ला झाला. त्यांच्या विरोधात वातावरण आहे, असे दृश्य चित्र असले तरी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालामध्ये कोणताही विपरित परिणाम दिसून आला नाही. ३१ पैकी बहुसंख्य ग्रामपंचायतींवर सोळंके यांचे समर्थक निवडून आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – मराठा व ओबीसी आरक्षणवादावर भाजप निश्चिंत

आरक्षण मागणीमुळे मराठा आणि ओबीसी प्रवर्गातील जातींमध्ये तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. छगन भुजबळ यांच्या आक्रमक मांडणीनंतर मराठवाड्यात ‘माधव’ सूत्रात बांधलेली मंडळी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत. ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. मात्र, सरसकट आरक्षणास विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ओबीसीची भूमिका छगन भुजबळ मांडत असले तरी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी या विषयावर माध्यमांमध्ये एकही वक्तव्य केले नाही. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी राज्य सरकारने पाठविलेल्या शिष्ठमंडळात मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी नक्की कोणती भूमिका निभावली, याचे कोडे भाजपमधील अनेक नेत्यांना पडले आहे.

मराठवाड्याचा ‘ओबीसी’ नेता अशी डॉ. भागवत कराड यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी खासे प्रयत्न केले. पण मराठा आरक्षणावर त्यांनीही कोणती भूमिका व्यक्त केली नाही. पंकजा मुंडे यांनी बीडमधील हिंसक घटनांचा आढावा घेत बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ओबीसीचे नेते माध्यमांमध्ये स्पष्टपणे भूमिका मांडू लागल्याने जरांगे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. सत्ताधाऱ्यांनी मागणी मान्य केली तर गुलाल लाऊन विजयी उत्सवात सहभागी होऊ असे जरांगे यांनी म्हटले होते. जरांगे विरुद्ध भुजबळ असा माध्यमी रंगलेला वाद आणि त्यातून आरक्षण मागणीसाठी होणाऱ्या वादामुळे दोन्ही बाजूने एकत्रिकरण व्हावे आणि ते आपल्या राजकीय बाजूने असावे असे प्रयत्न सर्वपक्षीय नेते करत आहेत. तर दुसरीकडे जरांगे यांनी नव्याने राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर कले आहे.

हेही वाचा – Chhattisgarh first phase : नक्षलप्रभावित भागातील २० पैकी ११ मतदारसंघांत वाढली मतदानाची टक्केवारी

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काही मोजक्याच मतदारसंघात मराठा-ओबीसी असे राजकीय समीकरण दिसून आले होते. त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होता. हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली मते जातीच्या ध्रुवीकरणाची होती. मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाल्यानंतर एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. अशी मोजकी उदाहरणे लक्षात घेता मराठा ध्रुवीकरणाचा राजकीय लाभ होऊ शकला नाही, असे आता सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will maratha unity due to reservation politically beneficial print politics news ssb