महाराष्ट्र निर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ तास दिल्लीत ताटकळत काढल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी बैठकीबाबत काहीही सांगण्यास नकार दिला असला तरी, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मनसे’ सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील घोषणा मुंबईमध्ये केली जाऊ शकते.
२०१९ मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. मात्र, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता. राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हीडिओ’ हे विधान कमालीचे चर्चेत होते. मात्र, पाच वर्षांनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून राज ठाकरे यांनीही राजकीय भूमिका बदलली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मदत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : Loksabha Election 2024 : महाराष्ट्रासंदर्भात ‘आप’ने घेतला महत्त्वाचा निर्णय; आगामी लोकसभा निवडणुकीत…
मुंबईमध्ये राज ठाकरे यांची प्रदेश भाजपच्या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह दिल्लीत येऊन दाखल झाले. राज ठाकरे प्रमुख्याने महाराष्ट्र व मराठी माणसाचे राजकारण करत असल्याने ते फार क्वचित दिल्लीत येऊ राजकीय भेटीगाठी घेतात. यावेळी ते भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून दिल्लीत आले एवढेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळ देईपर्यंत दिल्लीत मुक्काम करून राहिले. सोमवारी रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारे राज ठाकरे यांनी ‘या म्हणून सांगितले म्हणून आलो’, असे पत्रकारांना सांगितले होते. ठाकरे सोमवारी रात्रीच शहांची भेट घेणार होते. मात्र, शहांच्या भरगच्च पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे दोन्ही नेत्यांची भेट मंगळवारी दुपारी साडेबारानंतर झाली. राज ठाकरे यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हेही होते. शहा व ठाकरे यांची भेट अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगितले. या भेटीनंतर राज ठाकरे थेट मुंबईला निघून गेले.
महाविकासातील प्रामुख्याने शिवसेना- उद्धव ठाकरे गटाच्या मतांच्या विभागणीसाठी मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी काही भागांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचा लाभ मिळू शकतो, असे गणित भाजपने मांडले आहे. मुंबईमध्ये शिवसेना-ठाकरे गटाच्या मराठी मतांची विभागणी करण्याचा भाजपचा हेतू असल्याचे मानले जात आहे. त्यासाठी भाजपने राज ठाकरे यांची मनधरणी केल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस
मनसेच्या अडीच टक्के मतांसाठी…
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने १०१ जागा लढवल्या होत्या. त्यातील १ जागा जिंकली होती. मनसे १० उमेदवार दुसऱ्या तर २५ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मनसेला २.३ टक्के मते मिळाली होती. तसेच, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने १० जागा लढवल्या होत्या. त्यांच्या एकही उमेदवार विजय होऊ शकला नव्हता. ९ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. २०१४ मध्ये मनसेला १.५ टक्के मते मिळाली होती. भाजपला २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा जिंकाव्या लागतील. त्यामुळे मनसेची अडीच टक्के मतेही महत्त्वाची ठरणार आहेत. या मतांसाठी भाजप राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : बिहारमध्ये उत्तर प्रदेशपेक्षा निम्म्या जागा तरीही तिथे सात टप्प्यांत मतदान कशासाठी? विरोधकांचा सवाल
दक्षिण मुंबईत वर्चस्वाची लढाई?
महायुतीत मनसेचा अधिकृतपणे अजून समावेश झालेला नसला तरी, मनसेला दक्षिण मुंबईचा लोकसभा मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघांमध्ये सलग दोन वेळी ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले होते. इथून भाजपचे नेते व विद्यमान विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाचीही चर्चा केली जात आहे. मात्र, हा मतदारसंघ मनसेला मिळाला तर शिवसेना-ठाकरे गट व मनसे अशी थेट लढत होण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांसाठी ही वर्चस्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे.