महाराष्ट्रानंतर बिहार राज्यातही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे नितीशकुमार यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद), काँगेस तसेच इतर पक्षांना घेऊन पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. नितीशकुमार यांच्या या निर्णयानंतर राजकीय पातळीवर अनेक तर्क लावले जात आहेत. नितीशकुमार यांनी स्वत:चा पक्ष (जदयू) ) वाचवण्यासाठी भाजपाशी काडीमोड केली की, ते राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरण्याचा विचार करत आहेत? असे विचारले जात आहे.
हेही वाचा >> आपचं ‘मिशन गुजरात’! विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अरविंद केजरीवाल यांच्या उद्योजक, व्यापाऱ्यांसोबत बैठका
आगामी लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. २०२४ साली एप्रिल-मे महिन्यात ही निवडणूक होणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरणारा सर्वमान्य चेहरा कोण असावा, याची चर्चा विरोधी गटात सुरू आहे. असे असताना नितीशकुमार यांनी भाजपाशी केलेली काडीमोड पाहून आगामी काळात ते नरेंद्र मोदींना पर्याय ठरू शकतील, असे काही विरोधकांना वाटत आहे.
हेही वाचा >> स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: तिरंगा यात्रेवरून रंगले राजकारण
तर दुसरीकडे नितीशकुमार यांनी भाजपाशी तोडलेली युती म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी आहे, असे म्हणणे जरा आततायीपणाचे ठरेल, असे काही विरोधकांचे मत आहे. असे असले तरी बिहारमधील राजद-काँग्रेस-डावे पक्ष यांच्यातील महागठबंधन भाजपाविरोधात एक मजबूत आघाडी म्हणून समोर येऊ शकते. नितीशकुमार हे भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले नेते आहेत. त्यामुळे भाजपाशी असलेली युती तोडण्याचा हा निर्णय विरोधकांसाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करू शकतो, असेही काही नेतेमंडळींचे मत आहे.
सध्या काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वारून वाद सुरू आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले जात आहे. गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य हा काँग्रेसचा अध्यक्ष नसावा, असेही राहुल गांधी यांचे मत आहे. असे असेल तर संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व गैरकाँग्रेसी नेत्याकडे सोपवण्यास काँग्रेस पक्ष तयार आहे का? प्रश्न उपस्थित होतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील पंतप्रधानपदासाठी सर्वमान्य नेते आहेत. मात्र ते पंतप्रधानपदाची निवडणूक लढण्याची शक्यता नाही. तृणमूल काँग्रेस आणि पक्षाला सोबत घेण्यासाठीही एखादा सर्वमान्य नेता असावा, याची जाणीव काँग्रेसला आहे. असे असताना ज्या पक्षांना काँग्रेसचे नेतृत्व मान्य नाही, असे पक्ष नितीशकुमार यांना सर्वमान्य नेते म्हणून मान्य करू शकतात.
हेही वाचा >> शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना शालजोडीतला टोमणा
नितीशकुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा होतील का? या तर्काबाबत बोलताना “आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नितीशकुमार यांना महाराष्ट्र राज्यातून सर्वमान्यता मिळणार नाही. त्यामुळे नितीशकुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा होतील या सिद्धांताबाबत मला काही उत्सुकता नाही,” असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.