नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह ‘एनडीए’ ‘चारसो पार’ होणार असल्याची गर्जना केली असली तरीही, विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी त्यांना सत्तेपार करून धक्का देऊ शकेल का, ही उत्सुकता असेलच. आत्ताच्या घडीला ‘इंडिया’ आघाडी कितीही कमकुवत झालेली दिसत असली तरी, भाजप वेगवेगळ्या राज्यांमध्ये मित्र पक्षांची जमवाजमव करताना दिसत आहे, हे पाहता लढाई वाटते तितकी सोपी नसल्याची जाणीव भाजपला झालेली आहे.
भाजपसाठी उत्तर प्रदेश हा मुख्य आधार असेल. ८० पैकी ७०हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवलेले आहे. त्यासाठी निषाद पक्ष, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदल, अपना दल असे मित्र जोडले आहेत. या पक्षांना ८-९ जागा दिल्या जातील. मित्रांच्या माध्यमातून ‘ओबीसी’ गणितही पक्के केले आहे. महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत कळीचे असून तिथे कोणत्याही परिस्थितीत मित्र टिकवावे लागणार असल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचा १२-१३ जागांचा हट्ट नाइलाजाने का होईना मान्य करावा लागत आहे. भाजपची बिहारमध्ये अडचण झालेली आहे. नितीशकमार कुमार यांच्या जनता दलाला (सं) सोबत घेऊनही फायदा होईल अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे चिराग पासवानच्या ‘लोकजनशक्ती’ला ५ जागा देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भाजपला पश्चिम बंगालमध्ये किमान १० जागा अधिक मिळण्याची आशा आहे. २०१९ मध्ये तिथे भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. उत्तरेकडील राज्ये भाजपने ताब्यात घेतलेली आहेतच, तिथे सर्वच्या सर्व जागा मिळवून २०१९ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असेल.
हेही वाचा : ही तर खंडणी वसुलीच! निवडणूक रोखे प्रकरणावरून राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…
उत्तर आमचे, दक्षिणही आमचे!
गेल्या काही महिन्यांपासून मोदींनी दक्षिणेतील राज्यांमध्ये दौरे केले असून उत्तरेत काही गडबड झालीच तर, दक्षिणेतून काही जागा मिळवल्या तर ३७० जागांचे लक्ष्य अपूर्ण राहणार नाही असा सावध पवित्रा भाजपने घेतला आहे. म्हणूनच भाजपने २०२४ साठी ‘चलो दख्खन’ची मोहीम आखलेली आहे. आंध्र प्रदेशने भाजपला अजूनही स्वीकारलेले नाही, त्यामुळे चंद्राबाबूंचा तेलुगु देसम आणि पवन कल्याण यांची ‘जनसेना’ हे दोन मित्र जोडले आहेत. तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीत भाजपने खूप कष्ट करून हाती काही लागले नाही. पण, लोकसभा निवडणुकीत ४-५ जागा मिळाल्या तर सोन्याहून पिवळे असे भाजपला म्हणता येईल. कर्नाटक भाजपने गमावले असले तरी, दहा महिन्यांनंतर तिथली राजकीय परिस्थिती अनुकूल असल्याचे भाजपला वाटू लागले आहे. तामीळनाडू आणि केरळमध्ये एखाद-दोन जागा मिळवण्याचे भाजपचे ध्येय असेल. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने आक्रमक प्रचार सुरू केला होता. २०२४ मध्ये भाजपने ‘उत्तर आमचाच, दक्षिणेतही आमची मुसंडी’ असा नवा नारा दिला आहे.
हेही वाचा : मुलाला उमेदवारी मिळताच कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम? भाजपाचे नेते म्हणतात…
आम्ही पाटील आमच्या गावचे!
भाजपविरोधातील ‘इंडिया’ आघाडीची खरी ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये असून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, तामीळनाडू, केरळ या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, द्रमुक हे पक्ष स्वतंत्रपणे वा काँग्रेससोबत भाजपला रोखू पाहात आहेत. ‘इंडिया’ आघाडी म्हटली तर अस्तित्वात आहे, म्हटली तर स्वतंत्रपणे लढण्याची सवलतही घटक पक्षांनी एकमेकांना दिलेली आहे. दिल्लीमध्ये आप-काँग्रेस एकत्र आल्यामुळे गेल्यावेळप्रमाणे एकतर्फी लढत होण्याची शक्यता नाही. कदाचित इथले निकाल भाजपला चक्रावून टाकू शकतात. ‘इंडिया’चा सगळा भर दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसतो. पण, ‘इंडिया’साठी सर्वात महत्त्वाचे असेल महाराष्ट्र. उत्तर प्रदेशनंतर हेच सर्वात मोठे राज्य असून इथे फासे उलटे पडले तर ‘चारसो पार’चे स्वप्न भंग होण्याची भाजपला भीती आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत होऊ शकेल. इथे काँग्रेस व डावी आघाडी लढणार असली तरी तृणमूल काँग्रेसने धोबीपछाड दिला तर भाजपची पाच वर्षांची सगळी मेहनत वाया जाईल. राज्या-राज्यांत प्रादेशिक पक्ष स्वतःची पाटीलकी किती सांभाळतात यावर भाजपची घोडदौड अवलंबून असेल.
काँग्रेसची दुखरी नस…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उंचावली तर ‘इंडिया’ला बळ मिळू शकते. हे लक्षात घेऊन काँग्रेसने उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, गोवा, महाराष्ट्र, तामीळनाडू या काही राज्यांमध्ये आघाड्या केल्या आहेत. पण, काँग्रेससाठी उत्तरेतील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ ही काही राज्ये दुखरी नस ठरण्याची शक्यता आहे. या राज्यांतील सत्ता काँग्रेसने गमावली असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना खेचून आणणे काँग्रेससमोर मोठे आव्हान असेल.