राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली असली तरी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लढणार नाही हे सुद्धा सूचित केले आहे. सामुहिक नेतृत्वाखालीच भाजप निवडणुकीत उतरला असला तरी खासदार दिया कुमारी यांना दिले जाणारे महत्त्व याचीच राजकीय वर्तुळात अधिक चर्चा आहे. राजघराण्यातील दिया कुमारी या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना पर्याय ठरू शकतील का, या दृष्टीने राजकीय निरीक्षक बघत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमध्ये भाजप म्हणजे वसुंधरराजे हे समीकरण तयार झाले होते. पण मोदी-शहा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये वसुंधराराजे यांचे महत्त्व कमी करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले. गेल्या पाच वर्षांत वसुंधराराजे यांच्या विरोधकांना भाजपमध्ये अधिक महत्त्व देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेते निवडताना विरोधी गटाला पसंती देण्यात आली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तर वसुंधराराजे यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आपण चेहरा असावा ही वसुंधराराजे यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.

हेही वाचा : जरांगे-पाटील यांच्या दबावापुढे सरकार झुकणार का?

भाजपमध्ये धक्कातंत्राचा अवलंब करण्यात मोदी-शहा ही जोडी प्रसिद्ध आहे. यातूनच राजधानी जयपूरमधील पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने राजसंमद मतदारसंघाच्या खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेले आमदार नरपतसिंह राजवी यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. हे राजवी हे माजी उपराष्ट्रपती आणि राजस्थानमधील भाजपचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या भैरोसिंह शेखावत यांचे जावई आहेत. तसेच वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याऐवजी पक्षाने जयपूर राजघराण्यातील ५२ वर्षीय खासदार दिया कुमारी यांना मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे.

हेही वाचा : हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीने अशोक चव्हाण संतापले, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत

दिया कुमारी यांचा राजकारणातील प्रवेश हा वसुंधराराजे यांच्यामुळेच झाला. २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजघराण्यातील दिया कुमारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना सवाई माधोपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच निवडणुकीत त्या निवडून आल्या. वसुंधराराजे सरकार असताना जयपूरमधील राजमहालाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यावरून वाद निर्माण झाला. दिया कुमारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली होती. राजधानीतीस रजपूत समाजाने भाजप व वसुंधराराजे यांच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यातून वसुंधराराजे आणि दिया कुमारी या दोघींमध्ये वितुष्ट निर्माण झाले.

हेही वाचा : हरियाणा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर, महत्त्वाचे नेते राज्यभर दौरा करणार!

२०१८मध्ये दिया कुमारी यांनी निवडणूक लढविली नव्हती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दिया कुमारी यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्या खासदारपदी निवडून आल्या. तेव्हापासून पक्षात त्यांचा उदय होऊ लागला. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आले. पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदांमध्ये भूमिका मांडली. वसुंधराराजे यांना पर्याय म्हणूनच दिया कुमारी यांना पद्धतशीरपणे महत्त्व देण्यात आले होते.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पक्षाने वसुंधराराजे यांना पुढे केलेले नाही. राजघराण्यातीलच दिया कुमारी यांना पुढे आणून वसुंधराराजे यांना पर्याय म्हणून भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. वसुंधराराजे यांचा राजस्थानच्या राजकारणावर चांगलाच प्रभाव आहे. दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेले असल्याने राज्यात त्यांचा चांगला दबदबा आहे. याशिवाय पक्षावर त्यांची पकड आहे. यामुळेच वसुंधराराजे यांचा थेट काटा काढणे भाजप नेतृत्वाला शक्य झालेले नाही. या तुलनेत दिया कुमारी एवढ्या प्रभावी नाहीत. यामुळेच दिया कुमारी या वसुंधराराजे यांना पर्याय ठरू शकतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will princess diya kumari becoming alternative to vasundhara raje for bjp in rajasthan print politics news css