Prithviraj Chavan in Karad South Assembly seat: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आहेत. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांनी निसटता विजय प्राप्त केला होता. २०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात सहा हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांच्याविरोधात १६ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दी इंडियन एक्स्प्रेसने प्रचाराच्या धामधमुीत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे राजकारण, प्रचारातील मुद्दे, लाडकी बहीण योजना आणि इतर विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत खालीलप्रमाणे :

प्र. तुम्ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहात. तुम्हाला विजयाची कितपत खात्री वाटते?

चव्हाण : मागच्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी जनता माझ्या बाजूने आहे. पण, भाजपा आणि विशेषकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. एवढेच नाही, तर ते माझ्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. पण, मला असे ऐकायला मिळाले की, त्यांनाही त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक अवघड जात आहे.

हे वाचा >> Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?

माझा पराभव करण्यासाठी लोकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप होत आहे. मागच्यी तीन निवडणुकांमध्ये ज्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला, त्या फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीला यंदा पुन्हा निवडणुकीत उतरवले गेले आहे. ही निवडणूक आता पूर्वीसारखी सामान्य राहिलेली नाही.

प्र. महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते का? तुम्हाला काय वाटते?

चव्हाण : मविआची कामगिरी चांगली राहील, याबाबत मला विश्वास आहे. ६५ टक्के लोक आमच्या बाजूने आहेत; तर महायुतीला केवळ ३५ टक्के जनतेचा पाठिंबा आहे. लोकांनी राज्य सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार याआधी नाकारले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४५ जागा जिंकण्याचा दावा केला होता; पण महाविकास आघाडीला ३१ जागा; जिंकण्यात यश मिळाले. तेव्हापासून राज्यात काहीही बदलले नाही. महागाई तितकीच आहे, युवकांना रोजगाराचे प्रश्न भेडसावत आहेत, शेतकरी जीवन संपवत आहेत आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. अशा परिस्थितीत विद्यमान सरकारला पुन्हा कोण निवडून देईल?

प्र. महायुतीला काहीच संधी नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे?

चव्हाण : आकडेवारीवरूनच हे दिसतेय. आम्ही लोकसभेला ३१ जागा जिंकल्या आणि काही जागांवर अतिशय थोडक्या मतांनी आमचा काही ठिकाणी पराभव झाला. जर लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीचे बारकाईने विश्लेषण केले, तर आम्ही १६० मतदारसंघांत आघाडीवर होतो हे लक्षात येईल. आमची ही आघाडी अभेद्य आहे.

प्र. पण तीनही पक्षांतून वेगवेगळा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले होते. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे का?

चव्हाण : जागावाटपाची चर्चा, उमेदवारांची निवड करीत असताना प्रत्येक पक्षात हेवेदावे होतातच. लोकसभेच्या वेळेसही काही प्रमाणात संघर्ष झाला होता. काही जागांबाबत संघर्ष झाला असला तरी महाविकास आघाडी अभेद्य आहे.

प्र. काँग्रेसची राज्यभरात स्थिती कशी आहे?

चव्हाण : आम्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर चांगली कामगिरी केली. विदर्भात आम्ही चांगली कामगिरी केली. तसेच मराठवाड्यातही मविआला यश मिळाले. इथे मनोज जरांगे पाटील हा घटक विधानसभेतही महत्त्वाचा ठरेल.

प्र. जरांगे पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे?

चव्हाण : त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपला रोष व्यक्त केला. यावेळी जरांगे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. कुणाला निवडून द्यायचे किंवा पराभूत करायचे? हा निर्णय त्यांनी समाजावर सोडला आहे.

ज्या नेत्यांनी मराठा आरक्षाणाला पाठिंबा दिला नाही, त्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. मला वाटते, याचा महाविकास आघाडीला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये नक्कीच फायदा होईल.

प्र. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या पारड्यात मतदान पडेल, असे आपल्याला वाटते का?

चव्हाण : सहा महिन्यांत लोकांचा कल इतका वेगात बदलेल, असे मला वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत लोकांचा सरकारविरोधी कल दिसून आला होता. याही निवडणुकीत अशाच प्रकारचा कल दिसून येईल. ‘लाडकी बहीण’ योजनेचा थोडाबहुत परिणाम होईल; पण पूर्ण निकाल नक्कीच बदलणार नाही.

प्र. जर महाविकास आघाडीचा विजय झाला आणि काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून जर पुढे आला, तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असाल का?

चव्हाण : आमचा पक्ष अशा पद्धतीने काम करीत नाही. जर आमचा पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर पक्षाचे निरीक्षक आणि दिल्लीतील नेतृत्व याबाबत आमदारांशी बोलून निर्णय घेईल. सर्वांत आधी काँग्रेसचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल, जो मुख्यमंत्री असेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचे शक्तिस्थळ आणि उणिवा आहेत. आम्हाला आता तरुण नेत्याची गरज आहे.

प्र. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे व सोनिया गांधी यांनी सूचना दिल्यास तुम्ही हे पद स्वीकारणार का?

चव्हाण : अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याआधीच त्यांची संख्या मोजू नये, एवढेच आता म्हणेन.

प्र. तुम्ही आता ७८ वर्षांचे आहात, तुमचा निवृत्तीचा काही विचार आहे?

चव्हाण : मी निवडणूक लढवत आहे. कारण- मला लोकांची सेवा करायची आहे. त्यासाठी मला पक्षात कोणतीही जबाबदारी मिळो वा न मिळो, मी आनंदी आहे.

प्र. म्हणजे तुमची ही शेवटची निवडणूक आहे का?

चव्हाण : मी जर या निवडणुकीत उतरलो नसतो, तर भाजपाने कराड तालुका आणि सातारा जिल्हा वेठीस धरला असता. शेवटच्या निवडणुकीबाबत आताच काही सांगू शकत नाही. पुढील सहा महिन्यांत किंवा वर्षभरात निवडणुका होतील, तेव्हा पाहू. कारण- मोदी सरकारबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही.