नाशिक : एकेकाळी देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापेक्षा जास्त मताधिक्याने लोकसभेत काँग्रेसचा खासदार पाठवण्याचा विक्रम उत्तर महाराष्ट्राच्या नावावर आहे. सातपुडा पर्वतराजी ते सह्याद्री पर्वत रांगा असे सान्निध्य लाभलेल्या या भागात इतका ताकदवान असणारा हा पक्ष देशातील सत्ता गमावल्यानंतर दहा वर्षांत तोळामासा अवस्थेत पोहोचला. उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सहापैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचे प्रतिनिधित्व नाही. विधानसभेचे ३५ पैकी केवळ पाच मतदारसंघ ताब्यात आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने प्रदीर्घ काळानंतर उत्तर महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या गांंधी कुटुंबातील व्यक्तीमुळे पक्षाला उभारी मिळणार का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशलगत असणाऱ्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचे काँग्रेससाठी आजवर वेगळे महत्व राहिले आहे. इंदिरा गांधी असो वा सोनिया गांधी. देशातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ त्यांनी नंदुरबारमधून फोडल्याचा इतिहास आहे. सोनिया गांधींच्या राजकीय कारकिर्दीचे पदार्पण, आधारसारख्या महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी देखील काँग्रेसने नंदुरबारची निवड केली होती. २०१४ च्या निवडणुकीत प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांची सभा ऐनवेळी रद्द झाली. तत्पूर्वी २०१० मध्ये त्यांचा दौरा झाला होता. तेव्हापासून गांधी कुटुंबिय आणि नंदुरबारची तुटलेली नाळ १४ वर्षांनंतर यात्रेतून जोडली जात आहे.
हेही वाचा – आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?
प्रदीर्घ काळ नंदुरबारने काँग्रेसला साथ दिली. दिवंगत माजीमंत्री माणिकराव गावित हे आठवेळा निवडून आले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसने हा बालेकिल्ला गमावला. तेव्हापासून भाजपचे वर्चस्व आहे. विधानसभेच्या अक्कलकुवा मतदारसंघात के. सी. पाडवी तर नवापूरमधून शिरीष नाईक अशा चारपैकी दोन जागा काँग्रेसकडे आहेत. काही आजी-माजी आमदार पक्षात राहतात की नाही, हे सांगता येणे अवघड आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची चांगली स्थिती होती. फोडाफोडीच्या राजकारणात भाजपने तीही ताब्यात घेतली. पाच, सात वर्षांत पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमला गेला नाही. गांधी कुटुंबियाविषयी आदिवासी बांधवांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. भारत जोडो यात्रेतून सरकारविरोधी नाराजी प्रगट करत लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
हेही वाचा – शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह राजकीय विरोध सुरू, निवडणूक प्रचारात मुद्दा तापणार
धुळे जिल्हा देखील काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १५ वर्षांपूर्वी भाजपने तो ताब्यात घेतला. महाविकास आघाडीतील जागा वाटपात हा मतदारसंघ काँंग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. मधल्या काळात अमरिश पटेल यांच्यासह अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपला जवळ केले. विधानसभेच्या पाचपैकी धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसचा सध्या एकमेव आमदार आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील भाजपवासी झाले. जळगावमध्ये नेतृत्वाअभावी पक्षाची वाताहात झाली. मध्यंतरी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षात काहिशी धुगधुगी निर्माण झाली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रावेर आणि जळगाव हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मित्रपक्षांच्या वाट्याला जातील. त्यावर दावा सांगण्याइतकी काँग्रेसची ताकद नाही. जिल्ह्यातील १२ जागांपैकी रावेर-यावल हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. नाशिक जिल्ह्यातही काँग्रेसला नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मित्रपक्षांना साथ द्यावी लागणार आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा वगळता काँग्रेसचे फारसे कुठे अस्तित्व नाही. सत्तेची फळे चाखणारी काँग्रेसची अनेक मंडळी भाजपवासी झाली. संघटना खिळखिळी झाली. नव्याने ती बांधण्याकडे दुर्लक्ष झाले. सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलने करण्यात स्थानिक पदाधिकारी अपयशी ठरले. त्याची परिणती पक्ष संघटना निस्तेज होण्यात झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतून संघटनेत नवी जान फुंकण्याची धडपड आहे.
हेही वाचा – सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत
भारत जोडो न्याय यात्रेमुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात सकारात्मक वातावरण तयार होणार आहे. कार्यकर्त्यांना हुरुप येईल, त्यांचा उत्साह वाढणार आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येतील. सर्वांना मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खरे रुप पुढे आणावे लागेल. दुसरीकडे पक्ष संघटना बांधणीसाठी काम करावे लागणार आहे. मधल्या काळात बरेच लोक सोडून गेले. ही पोकळी भरून काढण्यासाठी नव्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याचे परिणाम पुढील काळात दृष्टीपथास येतील. – पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)