काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते खा. राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ पश्चिम वऱ्हाडातील वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातून जाणार असल्याने पक्षाचे नेते सध्या जोरदार तयारीला लागले आहेत. या परिसरात कधी ढुंकूनही न पाहणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा राबता वाढला. यानिमित्ताने गटातटात विभागलेल्या पक्षाचे अप्रत्यक्षरित्या ‘काँग्रेस जोडो’ अभियान सुरू आहे. राहुल गांधींच्या यात्रेतून वऱ्हाडात रसातळाला गेलेल्या काँग्रेसला नवे बळ मिळणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

हेही वाचा- पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीतील जुन्या संघर्षाचा नवा डाव

देशातील जनतेशी संवाद साधून त्यांच्याशी नाळ जोडण्यासाठी गांधी घराण्यातील काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ‘भारत जोडो यात्रे’चा श्रीगणेशा केला. विविध राज्यांमध्ये त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात्रेसोबत मोठा लवाजमा आहे. राहुल गांधींच्या यात्रेचा मार्ग, मुक्काम, सभा, भेटीगाठी याचे सूक्ष्म व संपूर्ण नियोजन दिल्लीतून करण्यात आले. यात्रेच्या नियोजनासंदर्भात राज्यातील किंवा स्थानिक नेत्यांना कुठलेही अधिकार नाहीत. यात्रेला जनतेतून अधिकाधिक प्रतिसाद मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी या नेत्यांवर आहे. त्याचे ‘लक्ष्य’ देखील नेत्यांना देण्यात आले. त्यामुळे गटतट विसरून काँग्रेसचे सर्वच नेते कामाला लागले आहेत. ही यात्रा राज्यात दाखल झाल्यावर नांदेड, हिंगोली मार्गे वाशिममध्ये दाखल होणार आहे. वाशिम व अकोला जिल्ह्यात दोन दिवस, तर बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम राहणार आहे. शेगाव येथे राहुल गांधींची जाहीर सभा होईल. या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, सहप्रभारी आशिष दुआ, आ. प्रणिती शिंदे यांचे परिसरात दौरे वाढले आहेत. स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन यात्रेला उदंड प्रतिसाद मिळण्यासाठी एकदिलाने कार्य करण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नेत्यांकडून सुद्धा बैठका, मिरवणूक, दुचाकी रॅली आदींच्या माध्यमातून यात्रेच्या प्रचाराचे कार्य सुरू झाले. काँग्रेसचे मोठे नेते खा.राहुल गांधी यांच्या यात्रेच्यानिमित्ताने काँग्रेस वऱ्हाडात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ही सक्रियता केवळ यात्रेपुरतेच की या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत होईल, हे येणारा काळच स्पष्ट करू शकेल.

हेही वाचा- गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; लिंग गुणोत्तर, साक्षरतेची काय स्थिती?

एकेकाळी पश्चिम वऱ्हाडात बलाढ्य पक्ष म्हणून ओळख असलेला काँग्रेस पक्ष आता अत्यंत कमकुवत झाला. अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रिसोड व मलकापूर येथे असे केवळ दोन आमदार आहेत. अकोला जिल्ह्यात अंतर्गत वादावादी आणि गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाचे अस्तित्व केवळ नावालाच बाकी आहे. २००४ पासून जिल्ह्यातून विधानसभेवर काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून जाऊ शकला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. स्थानिक स्वराज्य संस्थास्तरावर काँग्रेस दुहेरी आकडा देखील गाठू शकत नाही. काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था आहे. वाशिम जिल्ह्यात आ.अमित झनक यांनी रिसोड मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले. इतर ठिकाणी मात्र काँग्रेसची अवस्था बिकट आहे. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूरमधून राजेश एकडे यांच्या रूपाने एकमेव आमदार आहे. एकेकाळी वर्चस्व असलेल्या खामगाव, बुलढाणा, चिखली मतदारसंघात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. आगामी निवडणुकांमधील यशासाठी काँग्रेसला गटतट बाजूला सारत नव्याने सक्षम संघटन बांधणी करण्याची गरज राहणार आहे. राहुल गांधींची यात्रासाठी त्यासाठी पोषक ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.