नागपूर: भाजपने सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला असून रवींद्र चव्हाण यांची लवकरच प्रदेशा ध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष अँड. आशिष शेलार आदी ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून समन्वय राखण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने मुंबईतून लोढा व शेलार या दोघांनाच संधी दिली आहे.
भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी देताना काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळले आहे. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते असून त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती. त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून पक्षसंघटनेतही जबाबदारी देण्यात आली होती आणि कोकणसह राज्यभरात त्यांनी अनेक दौरे केले होते. बावनकुळे यांची प्रदेश अध्यक्षपदाची मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत असली तरी त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याने ‘ एक व्यक्ती, एक पद ‘ या न्यायाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य ज्येष्ठ नेत्याकडे दिली जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. भाजपचे प्रदेश अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी शिर्डीत होणार असून त्यात चव्हाण यांची निवड केली जाण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-Eknath Shinde : शिंदे यांची तारेवरची कसरत
फडणवीस व पक्षश्रेष्ठींनी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून. वगळून धक्का दिल्याचे मानले जात आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश देवून चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यास मुनगंटीवार यांनी जाहीरपणे विरोध केला होता. त्यांच्याऐवजी भाजपमधील नेत्याला उमेदवारी देण्याची त्यांची मागणी होती. त्यासाठी मुनगंटीवार यांनी दिल्लीला जावून वरिष्ठ नेत्यांना विनंतीही केली होती. पण त्यांचा विरोध डावलून फडणवीस यांनी जोरगेवार यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले. जोरगेवार यांच्या उमेेदवारीनिमित्ताने फडणवीस व पक्षश्रेष्ठींच्या निर्णयास केलेला विरोध मुनगंटीवार यांना महागात पडला. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधील वस्तुसंग्रहालयातून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री असलेल्या मुनगंटीवार यांनी बरेच प्रयत्न केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासंदर्भातील अनेक निर्णय, महाराष्ट्रगीत यासह अनेक बाबींमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. मात्र त्यांना पुन्हा संधी मिळू शकली नाही.
विजयकुमार गावीत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भाजप नेत्यांकडून भ्रष्टाचाराचे बरेच आरोप झाले होते. मात्र ते भाजपमध्ये आल्यावर त्यांना काही काळानंतर आदिवासी विकास खात्याचे मंत्रीपद मिळाले होते व मुलगी हीना गावीत या दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हीना गावीत यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली व पराभूत या बंडखोरीचा फटका विजयकुमार गावीत यांना बसला आहे. सुरेश खाडे यांना कामगारमंत्रीपद देण्यात आले होते. पण ते फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
आणखी वाचा-राष्ट्रवादीचे ‘फिरते’ मंत्री भुजबळ, वळसे-पाटील यांना नारळ
काही ज्येष्ठांना पुन्हा संधी
पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यावर विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर विधानसभा निवडणुकीत मात्र यश मिळाले. ओबीसी समाजाच्या नेत्या, महिला आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. फडणवीस यांच्या २०१४-१९ या मंत्रिमंडळातील सहकारी शेलार, संजय कुटे, जयकुमार रावल, अशोक उईके आदींना पुन्हा संधी मिळाली आहे. मेघना बोर्डीकर, नितेश राणे, जयकुमार गोरे, शिवेंद्र राजे भोसले, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, आकाश फुंडकर अशा नवीन चेहऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. राणे यांनी शिवसेना व खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गेल्या काही काळात जोरदार आघाडी उघडली होती व आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या लोढा आणि मुंबईत विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावलेल्या शेलार अशा दोनच नेत्यांना मुंबईतून मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.