सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्याकडे महाराष्ट्राची पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली असताना, अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाईल का, अशा प्रश्न पक्षातील नेत्यांना पडला आहे. पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करीत अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे पेच मात्र निर्माण केला आहे.
विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्ष संघटनेत कोणतेही पद द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात केली. अर्थात निर्णय पक्षाने घ्यायचा आहे, असेही त्यांनी सांगत पक्षाध्यक्ष व काका शरद पवार यांच्या कोर्टात चेंडू भिरकविला आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांतील घडामोडींमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदच अधिक समोर येत आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशबाबत मध्यंतरी वावड्या उठल्या होत्या. आमदारांचा एक गट अजितदादांबरोबर पक्ष सोडणार अशीही चर्चा सुरू होती. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून अजित पवार यांची कोंडी केल्याचे मानले जाते. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असला तरी त्यातून अजितदादांना खिंडीत पकडल्याचे मानले जाते.
पक्षाच्या वर्धापनदिनी दिल्लीत झालेल्या समारंभात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करतानाच त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली. या निवडीतून शरद पवार यांनी सुप्रिया सुळे याच आपल्या राजकीय उत्तराधिकारी असतील, असे स्पष्ट संकेत दिले. सुप्रिया सुळे यांची निवड ही अजित पवार यांना सूचक इशाराच मानला जातो. सुप्रिया सुळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपविली असतानाच, अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘पक्षात कोणतेही पद द्या, पक्ष कसा चालवितो हे दाखवून देईन’ असे अजित पवार यांनी काका शरद पवार यांनाच आव्हान दिल्याचे मानले जाते. अजित पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपविल्यास सुप्रिया सुळे यांचे महत्त्व कमी होईल. अजित पवार यांचा काम करण्याचा खाक्या लक्षात घेता ते कोणालाच फारसे महत्त्व देणार नाहीत. अजितदादा यांना प्रदेशाध्यक्षपदापेक्षा कमी दर्जाचे कोणतेही पद सोपविणे योग्य ठरणार नाही. तसेच त्यांनी आपल्याला राज्यातच काम करायचे आहे हे यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. यामुळे राष्ट्रीय सरचिटणीस वा उपाध्यक्ष अशी तत्सम पदे स्वीकारणार नाहीत.
हेही वाचा – जमाखर्च : सुरेश खाडे; ना कामगार, ना जिल्ह्याचे फक्त स्वत:चेच ‘कल्याण’
अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी काही काळ कायम ठेवले जाईल व सध्याची घडी विस्कटली जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे पक्षात बोलले जाते. पण अजितदादा विरोधी पक्षनेतेपदावर काम करण्यास तयार नसल्यास पक्षाला निर्णय घ्यावा लागेल. एकूणच अजित पवार यांच्या भूमिकेमुळे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या समोर पेच निर्माण झाला आहेे.