अकोला : शिवसेना शिंदे गटापुढे अकोला व वाशीम जिल्ह्यात अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी दोन ते तीन जागांवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून दावा करण्यात आला. मात्र, महायुतीमध्ये भाजप शिवसेनेसाठी अकोला आणि वाशीम जिल्ह्यात किमान एक तरी जागा सोडणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला. प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. महायुतीचे जागा वाटप स्पष्ट झाले नसले तरी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीने आप-आपली पहिली यादी प्रसिद्ध केली. अकोला व वाशीम जिल्ह्यात भाजपने केवळ अकोला पूर्व मतदारसंघातून आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत अकोला व वाशीम जिल्ह्याला स्थान नाही. दोन्ही जिल्ह्यातील सात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. शिवसेना शिंदे गटाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर व अकोट मतदारसंघावर दावा केला. अकोट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही जागा शिवसेनेसाठी सुटण्याची शक्यता दिसत नाही. बाळापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे परंपरागत हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे सांगून महायुतीमध्ये शिंदे गट त्यावर दावा करीत आहे.

हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

अकोला जिल्ह्यात सर्वाधिक प्रभाव भाजपचा आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जिल्ह्यात शत-प्रतिशनचा नारा देत पाचही जागा लढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शिवसेनेचा दावा असला तरी बाळापूरमध्ये देखील भाजपने मोर्चेबांधणी केली. बाळापूरमधून महायुतीकडून लढण्यासाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येही इच्छूक आहेत. महायुतीत भाजप घटक पक्षांसाठी बाळापूर मतदारसंघ सहज सोडण्याची शक्यता धूसर झाली आहे.

हेही वाचा : पहिल्याच दिवशीच्या अर्ज विक्रीतून विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत, ६२ जागांसाठी २ हजारांवर अर्ज विक्री

वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट दावा करीत आहे. एका आमदाराचे निकटवर्तीय येथून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रिसोडसाठी शिवसेना नेत्यांचा आग्रह आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रिसोडमधून अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढत काँग्रेसचे अमित झनक यांना काट्याची लढत दिली होती. आता ते भाजपवासी आहेत. त्यांचे पूत्र ॲड. नकुल देशमुख भाजपकडून लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे रिसोड मतदारसंघ महायुतीत अडचणीचा ठरू शकतो. अकोला व वाशीम जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला किमान एक तरी मतदारसंघ येतो का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अकोला व वाशीम जिल्ह्यातील दोन ते तीन जागांवर पक्षाचा दावा आहे. त्यापैकी बाळापूर मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असून पक्ष नेतृत्व योग्य निर्णय घेईल.

रामेश्वर पवळ, राज्य समन्वयक, शिवसेना शिंदे गट.