मुंबई : उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, सरकारी कर्मचारी, झोपडपट्टीवासीय, विविध भाषिक आणि धार्मिक अशी संमिश्र लोकवस्ती असलेल्या दक्षिण मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीमधील महत्त्वाचा भाग असलेल्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असली तरी शिवसेना शिंदे गटाने वादग्रस्त प्रतिमा असलेल्या यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यासाठी ही लढत अधिक सोपी झाल्याचे मानले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत होत आहे. महायुतीत दक्षिण मुंबई मतदारसंघाचा घोळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ आली तरी सुरुच होता. शेवटी शिंदे गटाने ही जागा पदरात पाडून घेतली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व बेहिशेबी मालमत्त जमा केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले यशवंत जाधव यांची पत्नी व भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरविले आहे. ठाकरे गटाने नेमके यावरच प्रचारात बोट ठेवले आहे. बेहिशेबी मालमत्ता, ५०च्या आसपास सदनिका असलेल्या जाधव यांना निवडून देणार का, असा सवाल ठाकरे गटाकडून केला जात आहे. हा प्रचारच शिंदे गटासाठी तापदायक ठरत आहे.

हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : तिरंगी लढतीत भिवंडीत भाजपसाठी आव्हान कायम

कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी आणि वरळी या सहा विधानसभा मतदारसंघांचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. या मतदारसंघात सहापैकी तीन शिवसेना, दोन भाजप आणि एक काँग्रेस असे आमदारांचे बलाबल होते. गुजराती, जैन, मारवडी मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने भाजपचा या मतदारसंघावर डोळा होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तयारीही सुरू केली होती. पण शिंदे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यातच ही जागा फार काही अनुकूल नाही, असे भाजपला सर्वेक्षणात आढळले होते. परिणामी भाजपला या मतदारसंघावरील दावा मागे घ्यावा लागला. पण यामिनी जाधव यांना शिंदे गटाने उमेदवारी दिल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यशवंत जाधव यांच्या विरोधात कारवाई करावी म्हणून भाजपनेच आंदोलन केले होते. त्याच जाधव यांच्या पत्नीसाठी भाजपला प्रचारात उतरावे लागले आहे. मिलिंद देवरा यांना राज्यसभेची खासदारकी मिळाल्याने ते लोकसभा लढण्यास फारसे उत्सुक नव्हते. तसेच शिंदे यांना मराठी चेहऱ्याला संधी द्यायची होती.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना दक्षिण मुंबई शिवसेनेत मोठे खिंडार पाडता आले नाही. काही नेते मंडळींनी शिंदे गटाची वाट धरली, परंतु आजही दक्षिण मुबंईमध्ये उद्धव ठाकरे समर्थकांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर शिवसेनेत फूट पाडणाऱ्यांवर नाराज झालेल्यांची संख्याही मोठी आहे. एकेकाळी दक्षिण मुंबईमधील काही भाग अस्सल मराठमोळे होते. मात्र गेल्या काही दशकांमध्ये मराठी टक्का कमी होत गेला आणि परप्रांतीयांची संख्या वाढली. त्याचा मराठी मतपेढीवरही परिणाम झाला. संपूर्ण मराठी टक्का केवळ शिवसेनेकडे उरला नाही. तर तो विभागला गेला. त्यामुळे केवळ मराठी मतांच्या जोरावर निवडणूक जिकणे अवघड बनले आहे. मुंबादेवी, भायखळा, डोंगरी, उमरखाडी, बेडी बाजार आदी भाग मुस्लीम बहुल आहे. मुस्लीम बांधवांची मतेही या निवडणुकीत निर्णायकी ठरण्याची शक्यता आहे. ही मतपेढी राखण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराची विजयाची वाट सुकर बनू शकेल. मराठी, अमराठी आणि अल्पसंख्यांक मतदारांची मोट बांधण्यात यशस्वी होणारा उमेदवार नक्कीच विजयश्री खेचून आणू शकेल, यात शंका नाही.

हेही वाचा…महाराष्ट्रातील दलित समुदाय घेतोय संविधान रक्षणाचा संकल्प; राजकारणातील संविधानाच्या दाव्या-प्रतिदाव्यांवर त्यांचे मत काय?

अरविंद सावंत हे २०१४ आणि २०१९ मध्ये निवडून आले असले तरी तेव्हा त्यांना भाजपची साथ होती. यंदा भाजप बरोबर नसला तरी मुंबादेवी मतदारसंघातील मुस्लीम मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल, असे चित्र आहे. यामिनी जाधव यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्याच्या उमेदवारीमुळे सावंत यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे मानले जाते.

हेही वाचा…आंध्रमध्ये सत्तेत जगनमोहन की चंद्राबाबू ?

कोणते विषय महत्त्वाचे ?

या मतदारसंघात मोडकळीस आलेल्या जुन्या चाळींची संख्या मोठी आहे. बहुसंख्य चाळींनी शंभरी पार केली आहे. या चाळी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र विकासकांकडून होणारी फसवणूक, शासन दरबारी मिळत नसलेले पाठबळ, पुनर्विकासासाठी घर रिकामे केल्यानंतर नवी इमारत किती वर्षात उभी राहील याची शाश्वती नसल्यामुळे रहिवाशी मुळ इमारतीमधील घर रिकामे करण्यास तयार होत नाहीत. इमारत धोकादायक बनली तरी अनेक रहिवाशी तेथेच वास्तव्यास आहेत. काही मंडळींनी घर रिकामे केले, इमारत जमीनदोस्त झाली, परंतु अनेक वर्षे लोटल्यानंतरही नव्या इमारतीची एक वीटही उभी राहिलेली नाही. पुनर्विकासाची चांगल्या योजनेच्या प्रतीक्षेत मतदार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the candidate s controversial image be a problem for eknath shinde s shiv sena in south mumbai lok sabha constituency print politics news psg