इंडिया आघाडीतून एक-एक पक्ष बाहेर पडत असताना आता एनडीएमधील घटक पक्षामध्येही मतभेद होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे महाष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आता एनडीएतीलच दोन घटकपक्षांनी दावा केला आहे. एकीकडे २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा आम्ही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे रिपाईच्या आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्यामुळे या जागेवरून भाजपाची चिंता वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे शिर्डी लोकसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ही जागा जर मित्रपक्षांना सोडली तर आपल्या पक्षातील नेत्यांकडून पक्षांतर होण्याची भीती एकनाथ शिंदे यांना आहे. तर आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरित ठेवण्यासाठी ही जागा आपणच लढायला हवी, असे आठवले यांच्या पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आठवले यांच्या पक्षाने मुंबईतील सहापैकी एक जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, मुंबईतील चार जागा आम्ही लढणार असून दोन जागा शिंदे गटाला देणार असल्याचं भाजपाकडून त्यांना संगितलं आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे आपले लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत, लाभ भाजपला; मुलाचा मतदारसंघ वाचविण्याचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी यासंदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले होते, “आम्ही एनडीएचा भाग आहोत आणि मी आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे.” आठवलेंच्या या विधानासंदर्भात बोलताना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते म्हणाले, ”युतीतील प्रत्येक पक्षाला आपल्याकडे असलेल्या जागा लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही शिर्डीच्या जागेवर दावा केला आहे. ज्यावेळी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी येथील आमच्या विद्यमान खासदाराने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी सोडणे आमचे कर्तव्य आहे.”
२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी यूपीएची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून ते एनडीएबरोबर आहेत.
२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला असला, तरी आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. शिवसेनेचे दोन गट पडले आहेत, त्यामुळे शिर्डी मतदारसंघावर आता शिवसेनेतील शिंदे गटाबरोबरच उद्धव ठाकरे गटाचेही लक्ष असेल. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे, त्यापैकी काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाकडे दोन आणि भाजपा आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक जागा आहे.
एनडीएसाठी आठवले महत्त्वाचे का?
भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएने आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी त्यांना आठवले यांच्या पक्षाची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे राज्यात आठवले यांच्या पक्षाचे आमदार-खासदार नसले तरी किमान २० ते २२ मतदार संघांमध्ये त्यांच्या पक्षाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरू शकतात.
दरम्यान, एनडीएतील दोन घटकपक्षांनी एकाच जागेवर दावा केल्याने भाजपाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रत्येक पक्षाने आपली इच्छा व्यक्त करणे स्वाभाविक आहे, यात काहीही गैर नाही. मात्र, आम्हाला सर्वच पैलूंचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. यासाठी जिंकण्याची क्षमता या निकषाचादेखील विचार केला जाईल. त्यानुसार वरिष्ठ नेत्यांशी बोलूनच जागावाटप निश्चित होईल.
हेही वाचा – काँग्रेसचे आठ-दहा माजी नगरसेवक शिवसेना-भाजपच्या वाटेवर ?
रामदास आठवले यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास, त्यांनी १९९८-१९९९ साली मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे; तर १९९९ ते २००९ दरम्यान पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. १९९० ते १९९६ दरम्यान ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यांच्याकडे सामाजिक न्याय, वाहतूक, रोजगार हमी आणि क्रीडा आणि युवक कल्याण यासारखी महत्त्वाची खाती होती. २०१४ मध्ये त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले आणि २०१६ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही ते याच खात्याचे मंत्री आहेत.