दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : काँग्रेसने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून एकसंघ पक्ष ही संकल्पना समोर ठेवून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा केलेला प्रयत्न पक्षाला उर्जा देणारा ठरला आहे. काँग्रेसचा बालेकिा पुन्हा जिंकण्यासाठी कहो दिलसे, काँग्रेस फिरसे म्हणत मतदारासमोर नेतेमंडळी मतदारांना सामोरे जाताना दिसले. मात्र हे नेत्यामधील ऐयय कायम राहते की पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जनसंवादचा विसंवाद ठरतो यावर भाजपचे लक्ष असणार आहे. काँग्रेसचे नेतृत्व विश्‍वजित कदम यांच्याकडे आल्याचे दिसत असले तरी या गटाचे लक्ष प्रामुख्याने जत अणि पलूस-कडेगाव या दोन मतदार संघावरच केंद्रित असल्याचे दिसत असल्याने सर्वसमावेशक नेतृत्व मिळविण्यासाठी डॉ. विश्‍वजित कद म यांना अजूनही बराच पल्ला गाठावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजप सांगलीत हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबाबत पक्षांतर्गत असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. मात्र, यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीचा बुस्टर लागणारच आहे. जत आणि पलूस-कडेगाव या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व सध्या कॉग्रेसकडे आहे. मात्र, तासगाव-कवठेमहांकाळचे राष्ट्रवादीकडे, खानापूर-आटपाडीचे शिवसेना शिंदे गटाकडे आणि मिरज, सांगलीचे भाजपकडे आहे. म्हणजे सहा पैकी तीन मतदार संघामध्ये आघाडीचे तर तीन मतदार संघामध्ये महायुतीचे वर्चस्व सध्या आहे. गेल्या चार वर्षात राज्यात केवळ सत्तेचा आणि पक्षांतराचा खेळ पाहण्यास मिळाला असला तरी या सत्तांतराचा मतदारांवर काय परिणाम झाला हे निवडणुकीच्यावेळी दिसून येणार आहे.

आणखी वाचा-पुण्याची पोटनिवडणूक टाळण्यासाठी नियमालाच बगल?

मतदारांची राजकीय संभ्रमावस्था असताना काँग्रेसने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळच्या जनसंवाद यात्रेमध्ये लोकसभेचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांचा चेहरा काँग्रेसने पुढे केला आहे. आमदार डॉ. कदम यांनी त्यांना घेउनच मतदार संघात संपर्क अभियान राबविले. मात्र, कॉग्रेसमध्ये ऐयय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न हा महत्वाचा भाग या जनसंवाद यात्रेत दिसून आला. काँग्रेसअंतर्गत चार गट सक्रिंय आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीवेळी हा विसंवादच काँग्रेसच्या पतनाला कारणीभूत ठरला. तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचीही अपेक्षित मदत झाली नाही. मात्र, या जनसंवाद यात्रेमध्ये मिरज मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे यांचा सहभागही महत्वाचा ठरला.

यावेळी काँग्रेसमधील सर्वच प्रमुख नेते या जनसंवाद यात्रेमध्ये सक्रिय सहभागी झाल्याचे दिसून आले. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनीही कदम गटाचे राजकीय वजन मान्य करीत दोन पावले माघार घेत राजकीय पटावर टिकून राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. जनसंवाद यात्रेमध्ये स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, डॉ. जितेश कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी मंडळी एक दिलाने यात्रेत सहभागी झाली. याचा फायदा केवळ लोकसभा, विधानसभेलाच होणार असे नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत होउ शकतो. गट-तटात विभागलेली काँग्रेस एकजिनसी होत आहे आणि याला जर महाविकास आघाडीची साथ मिळाली तर निश्‍चितच भाजपसाठी ही धोययाची नांदी ठरू शकते.

आणखी वाचा-कार्यकारिणी बैठकीतून काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी

भाजपच्या कारकीर्दीत कोणते नवे उद्योग आले, करोना काळात भाजपचे खासदार कुठे होते, जिल्ह्याच्या प्रश्‍नाबाबत खासदारांनी संसदेत काय केले असे प्रश्‍न काँग्रेसकडे विचारले गेले. जतचा पाणी प्रश्‍न ऐरणीवर असताना याबाबत भाजपची भूमिका कोणती असाही सवाल करीत सीमावर्ती भागासाठी मंजूर केलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेची निविदा प्रक्रिया होउन आठ महिन्याचा कालावधी झाला तरी काम का सुरू नाही आदी प्रश्‍न मांडले गेले. याची उत्तरे भाजपवाले देतीलच पण तिथेही विसंवादाचे राजकारण सुरू असल्याने एकसंघ काँगे्रसला असलेली अनुकूलता मतामध्ये परिवर्तित करणे आव्हानात्मक राहणार आहे.

लोकसभेबरोबरच काँग्रेसने जत, पलूस-कडेगाव आणि सांगली या तीन मतदार संघातील संभाव्य उमेदवाराचे चेहरे लोकासमोर ठेवले आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीचीही तयारी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. सांगलीत तर भाजपचे आमदार सुंधीर गाडगीळ कार्यसम्राट नसून केवळ निवेदन सम्राट आहेत. कृष्णा नदी प्रदुषण, कवलापूर विमानतळ, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र याबाबत काय विचारणा केली असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी सभेत उपस्थित करून पुढची निवडणुक अटीतटीचीच राहील याची व्यवस्था केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the congress take the stronghold of sangli again print politics news mrj
Show comments