नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या निवडणुका म्हणजे पूर्वपरीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. भाजपाने तेलंगणामध्ये प्रचाराची सूत्रे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्याकडे देऊन ‘आक्रमक’ प्रचारपद्धती अवलंबली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बंदी संजय कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही रणनीती मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना टक्कर देण्यास साह्यभूत ठरणार का, कुमार यांचा विजय तेलंगणामध्ये भाजपाचा पाया मजबूत करणार का, हे येत्या काळात कळेलच. त्याआधी बंदी संजय कुमार यांनी आखलेली भाजपाची रणनीती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाने पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी साधारण वर्षभर आधीच सुरू केल्याचे दिसते. लोकसभेचे खासदार व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार हे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारला पराभूत करण्याची तयारी करीत आहेत. मार्च २०२० मध्ये त्यांची प्रदेश पक्षाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते सरकारवर आक्रमकपणे शाब्दिक हल्ले करताना दिसत होते. तेलंगणामध्ये भाजपाचा पाया मजबूत होण्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रम राबवले.

तरीही कुमार यांच्या पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आली. “बंदी संजय कुमार कुठेही एकटेच जाणे पसंत करतात. पक्षाच्या इतर नेत्यांपासून ते अलिप्त राहतात आणि निर्णयप्रक्रियेत इतरांना सामील करून घेत नाहीत,” अशा त्यांच्याविषयी तक्रारी असल्याचे भाजपाच्या एका नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. कुमार यांच्या नेतृत्वावर नाराज असणाऱ्या दुब्बाका येथील भाजप आमदार एम. रघुनंदन राव, कोमातीरेड्डी राज गोपाल रेड्डी आणि अन्य काही नेत्यांनी २५ ऑक्टोबर रोजी राजीनामे दिले.

हेही वाचा : Rajasthan : निषेध, राजीनामे व पक्षांतर; तिकीटवाटपात बंडखोरी टाळण्याचे काँग्रेससमोर आव्हान

भाजपाने पक्षनेतृत्वामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे सांगितले होते. जून २०२३ च्या दरम्यान भाजपा पक्षनेत्यांनी बीआरएस पक्षाच्या दिशेने सौम्य भूमिका घेण्यास सुरुवात केली. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात आरोपी म्हणून अटक केलेली असतानाही भाजपाने थोडीशी नरमाईची भूमिका घेतली. गरज पडल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला बीआरएसचा पाठिंबा घ्यावा लागेल, या अपेक्षेने भाजपाने बीआरएसच्या बाबतीतला आपला आक्रमक दृष्टिकोन कमी केला असावा, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे होते. भाजपाने आंध्र प्रदेशातील ‘वायईएसआरसीपी’बाबतही नरमाईची भूमिका घेतली. पण, या भूमिकेमुळे पक्षाने बंदी संजय कुमार यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केले आणि ४ जुलै रोजी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले.

हेही वाचा : छत्तीसगडमध्ये विद्यमानांना धक्का; भाजपाने जाहीर केले ४ नवीन उमेदवार

भाजपाने कुमार यांना अन्य केंद्रीय संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या. परंतु, विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर पक्षाला भक्कम नेतृत्वाची गरज भासू लागली. निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस आणि बीआरएस असल्यामुळे निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार नेमण्याची आवश्यकता होती.

”बंदी संजय कुमार आमदार म्हणून निवडून आल्यास ते पक्षासाठी बरेच कार्य करू शकतात. विधानसभेमध्ये खंबीर नेत्याची गरज आहे. मुख्य म्हणजे पक्षाला मतदारसंघात विजयी होऊ शकणारा उमेदवार उभा करायचा आहे. त्यामुळेच संजय कुमार आणि डी. अरविंद या दोघांनाही विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले आहे. हे दोघे निवडणूक जिंकले, तर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बाकीचे उमेदवार निवडणूक जिंकतील, याची आम्हाला खात्री आहे,” असे ज्येष्ठ नेते के. लक्ष्मण म्हणाले.

बंदी संजय कुमार २०१८ मध्ये विधानसभेच्या करीमनगर मतदारसंघात पराभूत झाले होते; परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते करीमनगरमधून विजयीही झाले होते. या विधानसभा निवडणुकीत बंदी संजय कुमार, डी. अरविंद व आदिलाबादचे खासदार सोयम बापूराव यांना उमेदवारी देऊन भाजपा नवीन रणनीती आखत असल्याचे दिसते. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने केवळ एक जागा जिंकली. त्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते खूप मवाळ असल्याचे समजून, हिंदुत्वाच्या आक्रमक नेतृत्वासाठी संजय कुमार यांना पक्षाध्यक्ष केले होते.

डिसेंबर २०२० मध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणुकीत संजय कुमार यांनी आपले खंबीर नेतृत्व दाखवण्यास सुरुवात केली. परिणामी त्या निवडणुकीत भाजपाने १५० पैकी ४८ जागा जिंकून सर्वांना धक्का दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने हुजूराबाद व दुब्बाका येथील विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुका जिंकल्या. मात्र, मुनुगोडे येथे झालेल्या पोटनिवडणुकीत बीआरएसकडून भाजपाला पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर भाजपाने पुन्हा आक्रमकपणे कार्य करण्यास सुरुवात केली. कुमार यांनी २८ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यव्यापी प्रजा संग्राम यात्रा सुरू केली. तेव्हापासून या यात्रेद्वारे त्यांनी सुमारे ६० विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. १२० दिवसांत ते दीड हजार किलोमीटर फिरले. ही पदयात्रा संपल्यानंतर एका जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुमार यांचे कौतुक केले; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदयात्रा यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदनाचा फोन केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the decision to field banned mp sanjay kumar in the assembly elections be beneficial for the bjp vvk
Show comments