– महेश सरलष्कर, देवळी (राजस्थान)
राजस्थानमधील निर्णायक समूहांपैकी गुर्जरांच्या काँग्रेसवरील नाराजीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुर्जरांनी सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसला मते दिल्याचे मानले गेले होते. वास्तविक, पायलटांनी उभे केलेले काही गुर्जर उमेदवार पराभूत झाले होते.
पूर्व राजस्थानमध्ये गुर्जर आणि मीणा हे दोन समूह प्रभावशाली आहेत. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघ, देवळी-उनियारा, चाकसू, निवई, बुंदी, सवाई-माधोपूर आदी मतदारसंघांमध्ये हे दोन्ही मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतात. टोंकमध्ये ३५ हजार तर, देवळी-उनियारामध्ये ५० हजार गुर्जर आहेत. अन्य कुठल्याही राज्याप्रमाणे राजस्थानमध्येही आपापल्या समूहाच्या उमेदवाराला मते दिली जातात. गेल्यावेळी गुर्जरांनी काँग्रेसच्या दुसऱ्या समूहाच्या उमेदवारालाही मते दिल्याचे मानले गेले. देवळी-उनियारमध्ये काँग्रेसचे मीणा समाजाचे हरीशचंद्र मीणा यांनी भाजपच्या राजेंद्र गुर्जर यांचा पराभव केला होता. इथे गुर्जर मतांची विभागणी झाली होती.
यावेळी काँग्रेसच्या हरीशचंद्र मीणांविरोधात भाजपकडून विजय बैन्सला लढत आहेत. विजय हे गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे नेते किरोडीसिंह बैन्सला यांचे पुत्र आहेत. गुर्जरांनी अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते. मीणा ही अनुसूचित जमात असून त्यांनी गुर्जरांच्या मागणीला विरोध केला होता. या आरक्षणामुळे गुर्जर व मीणा समूहांमधील राजकीय संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत. इथे ७५ हजार मीणा मतदार असले तरी ५० हजार गुर्जर, १५ हजार जाट, १२ हजार राजपूत, ४० हजार ब्राह्मण-बनिया यांची मते मिळू शकतील असे गणित भाजपने बांधले आहे.
२०१८ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राज्यव्यापी दौरे केले होते. पायलट हेच मुख्यमंत्री होतील अशी आशा गुर्जर समाजाला वाटत होती. आपल्या समूहातील नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवले पाहिजे या भावनेतून गुर्जरांनी काँग्रेसला मते दिल्याचा दावा केला गेला. पण, सत्ता आल्यावर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने सचिन पायलट यांना डावलून माळी समाजातील अशोक गेहलोत यांना पुन्हा मुख्यमंत्री केले. कष्ट पायलटांनी केले पण, मुख्यमंत्री गेहलोत झाले. गुर्जर समाजातील पायलटांचा अपमान केल्याचा राग काँग्रेसविरोधात मत देऊन व्यक्त होण्याची शक्यता आहे.
‘टोंकमधून सचिन पायलट उमेदवार असल्यामुळे तिथले गुर्जर पायलटांना मत देतील. पण, इतर मतदारसंघामध्ये गुर्जर फक्त आपल्याच समाजाच्या उमेदवाराला मते देतील’, असा मुद्दा बिसलपूर धरणाशेजारील राजमहलमधील गावकऱ्यांनी मांडला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर गुर्जर नाराज असल्याची कबुली काँग्रेसच्या हरीशचंद्र मीणांच्या समर्थकांनीही दिली. मात्र, मुख्यमंत्रीपदी गेहलोत यांची निवड योग्य असल्याचा दावा या पाठिराख्यांनी केला. ‘गेहलोत माळी समाजाचे असून त्यांनी कधीही जातीवादाचा आधार घेतला नाही. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. सचिन पायलट मुख्यमंत्री झाले तर राजस्थानमध्ये जातीवाद वाढेल’, असे मत या कार्यकर्त्यांनी मांडले. गुर्जरांनी आरक्षणाची मागणी केल्यामुळे जातीवाद वाढल्याचा दावाही त्यांनी केला.
खरेतर २०१८ मध्येही गुर्जरांनी काँग्रेसला मदत केली नसल्याचे सांगितले जाते. जिंकलेल्या गुर्जर नेत्यांचे आपापल्या मतदारसंघामध्ये प्रभाव असून पायलटांमुळे ते विजयी झाले नसल्याचे मानले जाते. पायलटांनी तिकीट दिलेले उमेदवार पराभूत झाले होते. गेहलोतांविरोधात केलेल्या बंडामध्येही पायलट यांना गुर्जर आमदारांचा पूर्ण पाठिंबा मिळाला नव्हता. त्यामुळे गुर्जर नेते पायलट यांच्यासोबत नसल्याचे स्पष्ट झाले होते. ‘पायलट यांनी गेहलोतांविरोधातील बंड फसल्यानंतर देखील पायलट काँग्रेसमध्ये राहिले. त्यांनी पराभव मान्य केला. त्यांच्याकडे पाठिंबा देणारे पुरेसे गुर्जर नेतेही नाहीत. पायलट लढणार नसतील तर त्यांच्याबरोबर कशासाठी राहायचे असा विचार गुर्जर मतदार करत आहेत’, असा दावा टोंकमधील भाजपचे उमेदवार अजित मेहता यांच्या समर्थकांनी केला. २०१८ मध्येही गुर्जरांनी काँग्रेसला पुरेशी मते दिली नसतील तर यावेळी तर ती आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.