दिगंबर शिंदे
सांगली : दुष्काळाच्या छायेत अख्खा जिल्हा होरपळत असताना काँग्रेसने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतपेरणी सुरू केली आहे. लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी पायाभरणी करीत असतानाच जिल्ह्याचे नेतृत्वपद बिंबविण्याचे प्रयत्न आ. डॉ. विश्वजित कदम यांचे सुरू असून वसंतदादा पाटील यांचे वारसदार हे नेतृत्व मानणार की, पुन्हा कुरघोडीचे राजकारण रंगणार याचीच चर्चा या यात्रेच्या निमित्ताने होत आहे. महागड्या वाहनांचा ताफा, ऐशोरामाची बैठक व्यवस्था असलेल्या बस, फटाक्याबरोबरच फुलांची उधळण दुष्काळी जनतेच्या वेदनेवर फुंकर मारण्यापेक्षा डागण्या देण्याचेच काम करीत आहे की काय अशी रास्त शंका विचारली जात आहे.
डॉ. विश्वजित कदम यांनी लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील आणि आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना सोबत घेउन जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. आठ दिवसांच्या यात्रेची सुरूवात मिरज तालुक्यातील बेळंकी येथून झाली. ही यात्रा सर्व तालुक्यातून मार्गक्रमण करणार असली तरी जास्तीचा भर सांगली लोकसभा मतदार संघातील तालुक्यावर आहे. वाळवा व शिराळा तालुक्यातून ही यात्रा केवळ एक दिवसांचा दौरा करणार आहे. या यात्रेसाठी स्थानिक गाव पातळीवरील सामान्य माणसाऐवजी अन्य ठिकाणाहून आ(ण)लेल्या कार्यकर्त्यांचीच गर्दी अधिक दिसत होती. तशातच या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने ही यात्रा काँग्रेसची आहे की महाविकास आघाडीची असा प्रश्न पडला नसता तरच नवल. यात्रेच्या प्रवासात विविध ठिकाणी सभेचे आयोजनही करण्यात येत असून नेतेमंडळींकडून पाणी, चारा टंचाई यासारख्या सध्या भेडसावत असलेल्या प्रश्नाला स्पर्शही न करता राजकीय अजेंडा म्हणून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. महागाई, खोके या चावून चावून चोथा झालेल्या विषयावरच भाष्य करून मतांचे गणित मांडण्याचा प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा… पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचे फलित काय?
वास्तविकता न भूतो, न भविष्यती असा दुष्काळ शेतकर्यांच्या उंबर्यावर येउन ठेपला आहे, सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी ही मंडळी सत्तास्थानी असताना शासन स्तरावरून अद्याप दुष्काळ गांभीर्याने घेण्यात आलेला नाही. यंदा राज्यात सर्वाधिक कमी पाउस सांगली जिल्ह्यात झाला आहे. नदीकाठचा भाग वगळला तर अन्य ठिकाणी आताच पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनेच्या पाण्यासाठी संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. जत, आटपाडी तालुययात पाण्यासाठी मारामारीची स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय दबावातून पाणी पळविले जात असल्याचा आरोप आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील गावकरी करताच आमदार गोपीचंद पडळकरांनी जातीने उपस्थित राहून कालवा जेसीबीने फोडून पाणी दिले. मात्र, जत तालुक्यात वन जमिनीतून चर काढण्यास प्रतिबंध करण्यात आला, याची तड लावण्यात ना सत्ताधारी ना विरोधक पुढे आले. आज बोलाचालीच्या पातळीवर असलेला संघर्ष हा रोजच्या जगण्यातील उद्विग्नतेतून होत आहे. भविष्यात हा संघर्ष हातघाईवर आला तर नवल वाटणार नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या आशेवर सामान्य माणूस असताना काँग्रेसचा राजकीय हेतू आणि मतांचे राजकारण कशासाठी असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा… शिंदे यांच्या शिवसेनेचा देशभर विस्तार?
जनसंवाद यात्रा गावात आली की, ढोलताशांचा दणदणाट आणि फटाक्याची आताषबाजी केली जात आहे. याच बरोबर नेतेमंडळींच्यावर फुलांच्या पाकळयाची उधळण करून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. हा सारा प्रकार म्हणजे दुष्काळाने होरपळत असलेल्या सामान्य जनतेच्या वेदनेवर फुंकर मारण्याऐवजी मीठ चोळण्यातला प्रकारच म्हणावा लागेल. दुष्काळ प्रश्नी एखादे आंदोलन हाती घेउन जर प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच पक्षाबद्दल आणि नेत्याबद्दल सहानभुती निर्माण होउ शकते. मात्र त्याचच नेमक विस्मरण काँग्रेसला झाले आहे का? काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करून सर्वसामान्य जनतेत आपुलकीची भावना निर्माण करीत सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. याचा लाभ कर्नाटकात काँग्रेसला झाला. आता भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रसचे स्थानिक नेते दुरावलेले सामान्य लोक पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी यात्रेसाठी करण्यात आलेला जामानिमा हेच सर्वसामान्यांशी नाळ जोडण्यातील खरी आडकाठी ठरण्याचीच चिन्हे आहेत.