अलिबाग : ग्रामपंचायत निवडणूकीनंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप मध्ये वाद निर्माण झाला होता. या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पडदा टाकला आहे. नाराज असलेल्या शिवसेना शिंदे गटाशी चर्चाकरून केली आणि यापुढे शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून कोणताही त्रास होणार नाही असेही स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात उभय पक्षांमधील नेत्यांमध्ये असलेले टोकाचे मतभेद लक्षात घेता ही मध्यस्थी यशस्वी ठरणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यात २१० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. या निवडणूकीत भाजपच्या भुमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. दोन्ही सत्ताधारी पक्षातील वाद शेकापच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. यामुळे निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची टीम ही शेकापची दुसरी फळी म्हणून काम करत होती, असा थेट आरोप शिंदे गटाने केला होता. शेकापमधून भाजपमध्ये आलेले नेते हे शिवसेना आणि भाजप वादाच्या केंद्रस्थानी असल्याचा दावाही शिंदे गटाने म्हटले होते. हीच परिस्थिती कायम राहीली तर आगामी निवडणूकांमध्ये शिवसेनेलाही वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा देण्यात आला होता.
हेही वाचा : पुण्यात मुरलीधर मोहोळ – जगदीश मुळीक यांचे उमेदवारीसाठी असेही शक्तिप्रदर्शन !
काही दिवसांपुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महासंकल्प २०२४ आंतर्गत अलिबागचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी रायगड लोकसभेच्या जागेसह अलिबागची जागा लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या दिलीप भोईर यांना आमदार करणार की नाही असा सवाल यानंतर घेतलेल्या सभेत केला होता. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती.
या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील तीनही आमदार आणि पक्षपदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. दोन्ही पक्षात निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला, भाजपकडून यापुढे शिवसेनेच्या शिंदे गटाला कोणताही त्रास होणार नाही असा शब्द त्यांनी दिला. यानंतर नाराज असलेला शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी माघारी परतले. त्यामुळे सध्यातरी दोन्ही पक्षातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहे.
रायगड जिल्ह्यात भाजपच्या वाढत्या राजकीय महत्वाकांक्षा शिवसेना शिंदे गटासाठी धोकादायक ठरत आहेत. कोकणात फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपने विविध पक्षातील प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेऊन, आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या नेत्यांकडून शिवसेनेच्या शिंदे गटाची कोंडी करण्याचे धोरण राबविले जाऊ लागले आहे. प्रशांत ठाकूर यांना पक्षात घेऊन आधी पनवेल मतदारसंघ भाजपने जिंकला. नंतर उरणमध्ये महेश बालदी यांना उमेदवारी देऊन भाजपने शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा पराभव केला. आता शेकापच्या दिलीप भोईर यांनी पक्षात घेऊन अलिबाग भाजपने तयारी सुरू केली. तर कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा : भाजपाच्या माजी आमदाराची ‘सेक्युलर’ कविता वगळली; गोव्यातील चित्रपट महोत्सवाला वादाची फोडणी
“शेकापमधून भाजपमध्ये आलेले काही नेते युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील हा वाद विरोधकांच्या पथ्यावर पडत आहे. हे आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी यापुढे भाजपकडून शिवसेनेच्या शिंदेगटाला कुठलाही त्रास होणार नाही असा शब्द दिला आहे.” – राजा केणी, जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट