संजीव कुळकर्णी
नांदेड : २०१४ ते १९ दरम्यान राज्यात अस्तित्वात असलेल्या भारतीय जनता पक्ष -शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, त्यात मुख्यमंत्री शिंदे यांचाही समावेश होता या वक्तव्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पक्षनिष्ठेवरील गेल्या महिन्यापासून लागलेले प्रश्नचिन्ह आता सर्वसामांन्याच्या मनातून दूर झाले आहे. या वक्त्व्याबरोबरच नांदेड येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीमुळे अशोकरावांच्या पक्षांतराविषयी मतदारांच्या मनात असणारे मळभ आता दूर होऊ लागले असले तरी काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या मनातील मळभ दूर होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत तसेच या यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील सुमारे दीडशे कि. मी. प्रवासादरम्यानच्या स्थानिक नियोजनासंदर्भात गेल्या सोमवारी नांदेड येथे अशोक चव्हाण यांनी दीर्घ बैठक घेतली. या बैठकीपूर्वी काँग्रेसतर्फे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली किशोर स्वामी, नीलेश पावडे प्रभृतींचे एक शिष्टमंडळ केरळला गेले होते. दोन दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी यात्रेच्या प्रवास तसेच मुक्कामादरम्यानच्या एकंदर व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक ती माहिती संकलित केली. त्याच धर्तीवर आता नांदेड जिल्ह्यातील मुक्काम स्थळांवर व्यवस्था करण्यात येणार आहे.
खासदार गांधी यांची यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील देगलूर शहरात सर्वप्रथम दाखल होत असून त्यानंतर ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात जाईपर्यंत गांधींसह सुमारे सव्वाशे भारत यात्रींचे सहा मुक्काम पडतील, असे गृहीत धरून नियोजन सुरु झाले आहे. जिल्ह्यातील पहिली सभा देगलूरला तर दुसरी नांदेड शहरात होईल.
हेही वाचा… अशोक गेहलोतांच्या हातून मुख्यमंत्रीपदही जाणार?
यात्रेकरूंच्या मुक्कामस्थळांची निश्चिती तसेच इतर व्यवस्था कुठे व कशा प्रकारे कराव्या लागतील याचा आराखडा तयार करण्यासाठी आ. राजूरकर, डी. पी.सावंत, किशोर स्वामी, नीलेश पावडे, संतुका पांडागळे, मुन्ना आब्बास, विजय येवनकर, लक्ष्मीकांत गोणे प्रभृतींचे एक पथक बुधवारी देगलूरला गेले. तेथून त्यांचे पाहणी अभियान सुरु झाले. देगलूर, शंकरनगर, कृष्णूर, तुप्पा – जवाहरनगर इत्यादी ठिकाणी यात्रेकरूंच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी सुमारे 3 ते 4 एकर सपाट जागा या पथकाला निश्चित करावयाची आहे. तसेच तेथे पाणी व इतर बाबींच्या व्यवस्थेची आखणी जिल्ह्यातील आयोजन समितीला करावी लागणार आहे.
हेही वाचा… सतेज पाटील – महाडिक कुटुंबातील वादाला नव्याने उकळी; राजाराम साखर कारखान्याची सभा गाजणार
कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या यात्रेला केरळ राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वेगवेगळ्या प्रसिद्धी – प्रसार माध्यमांतून समोर येत असताना ‘भारत यात्री’ म्हणून निवड झालेले मुखेड येथील श्रावण रॅपनवाड यांनी या माहितीला दुजोरा दिला. तीन आठवड्यांतील एकंदर अनुभव उत्साहवर्धक असून काँग्रेस पक्षात नसलेले; पण यात्रेतल्या मुद्यांशी सहमत असलेले अनेक समविचारी नेते प्रत्यक्ष पायी चालण्यात सहभागी होत असल्याचे रॅपनवाड यांनी बुधवारी केरळमधून सांगितले.
या यात्रेतील खा. गांधी व इतर भारत यात्रींच्या निवास, भोजन व इतर व्यवस्थेबाबतची माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. पण सुमारे दीडशे यात्रेकरूंना झोप, विश्रांतीसाठी 60 कंटेनर्स (ट्रक) मध्येच सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. प्रातर्विधीच्या व्यवस्थेचे वेगळे कंटेनर्स यात्रेसोबत आहेत. निवास, भोजन व इतर व्यवस्थांचे कंत्राट एका महिला व्यावसायिकाकडे असून यात्रेकरूंची कोठेही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे, असे रॅपनवाड यांनी नमूद केले.
भारत जोडो यात्रेच्या तयारीबरोबरच अशोक चव्हाण यांच्या एकनाथ शिंदे यांच्या बाबतच्या वक्तव्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून सुरू असणाऱ्या पक्षांतराच्या चर्चेला अशोक चव्हाण यांनी पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.