दिगंबर शिंदे
सांगली : शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. आता क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
रघुनाथ पाटील यांची शेतकरी संघटना अगोदर लढावू संघटना म्हणून ओळखली जात होती. मात्र, शेतकर्यांच्या मतावर राजकीय पीक जसे जोमदार होउ लागले तशी शेतकर्यांची ताकद वेगवेगळ्या संघटनामध्ये विभागात गेली. यामुळे दोन दशकापुर्वीचा जोश या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.
हेही वाचा… गौरव सोहळ्याला उपस्थित राहून शरद पवार मोदींविरोधात सक्रिय
दादांची शेतकरी संघटना, संजय कोले यांची शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, बी. जी. काका पाटील यांची बळीराजा शेतकरी संघटना, माजी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांची रयत क्रांती संघटना, धनाजी चुडमुंगे यांची शिरोळ परिसरात आक्रमकपणे कार्यरत असलेली संघटना या कार्यरत आहेतच. पण आजच्या घडीला रस्त्याावर उतरून प्रखर आंदोलन करणारी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही दखलपात्रच नव्हे तर आपले उपद्रव आणि उपयोजन मूल्य राखून आहे. उस व दूधदराचे आंदोलन, साखर कारखान्यावर संगणकीकृत वजनकाटे आदीबाबत ही संघटना आक्रमक राहिली आहे. लोकसभेतही या संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. तर याच संघटनेतून बाहेर पडलेले माजी राज्यमंत्री खोत यांनी रयत क्रांती या नावाने वेगळी चूल मांडली.
शेती व्यवसायातील अशाश्वत अर्थाजनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आगतिक झालेला शेतकरी संघटित नसल्याने त्यांच्यापुढील प्रश्नांची सोडवणूक होत नाही. विविध राजकीय पक्षांनी शेतकर्यांच्या समस्येचे भांडवल करून राजकीय लाभ मिळवला. मात्र, पिढ्यांन पिढ्या न सुटलेले प्रश्न आहेत, तसेच आहेत, उलट वेगवेगळे प्रश्न नव्याने समोर येत आहेत. अगदी बोगस खत, बियाणापासून ते तलाठ्याकडे सातबारा उतारा काढण्यापर्यत शेतकरी वर्गाला नागवले जाते. हा सार्वत्रिक अनुभव असताना सातबारा कोरा कसा होणार हाही प्रश्न आहेच. सत्तेवर आले की शेतीसाठी नव-नवीन योजनांची घोषणा होते, काही अंमलात येतात, तर काही लाल फितीच्या फाईलीत अडकतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे आश्वासन बीआरएसने आजच्या घडीला दिलेले नसले तरी एक प्रकारची उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे.
हेही वाचा… के. चंद्रशेखर राव यांची कोल्हापूर, सांगलीत राजकीय मशागत
चंद्रशेखर राव यांना प्रस्थापितांमधून एखादा लोकनेता हाती लागेल अशी अपेक्षा असताना सांगली जिल्ह्यात इस्लामपूरचे रघुनाथ पाटील हाती लागले. तत्पुर्वी बळीराजाचे बी. जी. काका पाटील यांनी चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क केला होता. त्यांनी पक्ष बांधणीसाठी तयारीही केली होती. त्यानंतर मात्र रघुनाथदादा पाटील हे बीआरएसच्या बरोबर जात आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व राजू शेट्टी यांनी यापुर्वी केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपशी युती केली होती. मात्र, राज्य पातळीवर त्यांच्याच संघटनेने विधान परिषदेवर पाठविलेल्या सदाभाउ खोत यांना ताकद व अतिरिक्त महत्व देण्याचे भाजपचे प्रयत्न न पटल्याने त्यांनी भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादीशी युती केली. मात्र, निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून त्यांचा एकला चलोचा नारा सुरू आहे.
हेही वाचा… वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’चे गणित बिघडवणार?
आता बीआरएस लोकसभा निवडणूक लढविणार की विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे हे अस्पष्ट असले तरी रघुनाथदादा बीआरएसचे संभाव्य उमेदवार असतील अशी अटकळ बांधली जात आहे. यापुर्वी त्यांनी तीन वेळा वेगवेगळ्या पक्षाबरोबर युती करून लोकसभा निवडणुक लढवली होती. २००९ मध्ये शिवसेनेबरोबर युती करून मैदानात उतरले त्यावेळी त्यांना १ लाख ३६ हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये बसपाची मदत घेउन लढले, तर २०१९ मध्ये आम आदमी पार्टीशी युती करून निवडणुक लढवली. मात्र, मतांचा आलेख कमीच झाला. गेल्या निवडणुकीत त्यांना दहा हजार मतांचा आकडाही गाठता आलेला नव्हता.
हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा हे दोन मतदार संघ आहेत. भाजपने शतप्रतिशतचा नारा देत ४५ जागांंचे लक्ष्य समोर ठेवले आहे. विद्यमान खासदार भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटात आहेत. तर शेट्टी यांची निवडणुकीची तयारी सुरू आहे. भाजपने या मतदार संघाचे प्रमुख म्हणून शिराळ्याचे सत्यजित देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर याच मतदार संघातील आ. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे वजनदार नेते आहेत. कृष्णा-वारणा, पंचगंगा नद्यांच्या खोर्यातील यापुढचा राजकीय संघर्ष प्रदर्शनीय ठरण्याचीच चिन्हे आहेत.