भंडारा : काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष नाना पटोले यांना एकीकडे राज्य पातळीवर पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, गृहजिल्ह्यातील एका मतदारसंघात नानांसमोर संघटनात्मक आव्हान उभे ठाकले आहे. ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून नानांना डोक्यावर घेणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी आता बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार चरण वाघमारे यांना त्यांचा विरोध आहे. यावरून स्थानिक काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट होत असून नानांची गृहजिल्ह्यावरील पकड सैल झाल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीत तुमसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाणार, हे स्पष्ट आहे. शरद पवार गटाकडून वाघमारे यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. मात्र, वाघमारे यांच्यामुळे काँगेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादळ उठले आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चरण वाघमारे यांच्या विरोधात एकत्र येत ‘नाना’मार्गांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाघमारे यांची लोकसभा निवडणुकीतील योगदानाची परतफेड म्हणून त्यांना महाविकास आघाडीत जागा देण्यात आली. मात्र त्यावरून जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि गटबाजी पटोले यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा – ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वाघमारे यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि तब्बल २७ हजार मतांनी ते विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना (अपक्ष) पराजयाचा सामना करावा लागला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वाघमारे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. वाघमारे तुमसरमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटला. यामुळे वाघमारेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली. यामुळे स्थानिक नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. यातूनच त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित बंड पुकारले आहे.

नेत्यांमध्ये असंतोष

जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर, माजी आमदार अनिल बावनकर, कलाम शेख यांनी वाघमारेंच्या संभाव्य उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे निकटवर्तीय एकनाथ फेंडर हे येथून लढण्यास इच्छुक आहेत. कलाम शेख हे शिशुपाल पटले यांचे समर्थक असून पटले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी वाघमारेंना विरोध दर्शवल्याचे बोलले जाते. काँग्रेसमधील या असंतोषाचा स्फोट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले

शिशुपाल पटले यांचे काय?

भाजप नेतृत्वाच्या कार्यशैलीवर टीका करीत माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँगेस पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर तेच तुमसर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशा चर्चा होत्या. मात्र, आता या जागेवर चरण वाघमारे यांची वर्णी लागणार असल्याने पटले यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winds of rebellion in congress in nana patole bhandara district what exactly is the reason print politics news ssb