सांगली : जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी राजकीय वारसदार म्हणून पुत्राला पुढे केल्याने मिरज विधानसभा मतदारसंघातील गटबाजीचे परिणाम पक्ष विस्तारावर होऊ लागल्याने सावध झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा कौटुंबिक वाद कुटुंबातच आणि सत्वर मिटवावा अन्यथा पक्षाला पर्याय शोधावा लागेल असा इशारा दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून उफाळून आलेल्या या वादामुळे मिरजेत दोन स्वतंत्र दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केल्याने पक्षाचे कार्यकर्तेही दुभंगले आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खाडे यांची मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री पदही मिळाले. यानंतर मात्र, या गटाला बेबनावाचे आणि मतभेदाचे ग्रहण लागले. खाडे यांनी यापूर्वी जतचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, मिरज मतदारसंघ आरक्षित होताच त्यांनी मिरजेकडे मोर्चा वळवला. त्यांचे मूळचे गाव तासगाव तालुक्यातील पेड. मुंबईमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये कार्यरत असलेले खाडे काही काळ रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. मात्र, भाजपच्या उमेदवारीवर जतमध्ये निवडणूक लढवून पश्चिम महाराष्ट्रातील पहिले भाजपचे आमदार झाले. यानंतर २००९ मध्ये झालेल्या मिरज दंगलीच्यावेळी भाजपला ज्या बोनस जागा मिळाल्या, यामध्ये मिरजेतील जागा महत्त्वाची ठरली. या सर्व घडामोडीमध्ये त्यांचे स्वीय सहायक म्हणून सावलीसारखे पाठीशी असलेले प्रा. मोहन वनखंडे यांची रणनीती बरीच कारणीभूत ठरली होती. राजकीय तडजोडी, कार्यकर्त्यांचे रूसवे-फुगवे काढून त्यांना खाडे यांच्या विजयात सहभागी करून घेण्यात वनखंडे यांचा पुढाकार मोलाचा ठरला.
राज्यात सत्तांतर होताच, पालकमंत्री म्हणून खाडे यांची वर्णी लागताच त्यांनी वनखंडे यांना दुय्यम स्थान देत पुत्राला पुढे आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. कोणताही घटनात्मक अधिकार अथवा पक्षीय पद नसताना शासकीय व पक्षाच्या बैठकांमध्ये पुत्र सुशांत खाडे यांचा होत असलेला हस्तक्षेप भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मानवेना झाला आहे. यातच वनखंडे यांना मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि पालकमंत्री खाडे यांचे पुत्र प्रेम अनेक कार्यकर्त्यांना खुपणारे ठरत आहे. खाडे यांचे राजकीय वारस म्हणून पुत्राच्या हाती चाव्या देण्याची खासदार संजयकाका पाटील यांनी केलेली जाहीर मागणीही या फुटीच्या आगीत तेल ओतणारी ठरली. यातूनच यावर्षी मिरजेत भाजपअंतर्गत असलेल्या दोन गटांच्या दोन स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
वनखंडे यांनी जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांच्यासह महायुतीची दहीहंडी स्वतंत्रपणे आयोजित करून पुढील दिशा निर्देशित करण्याचा प्रयत्न केला. तर पालकमंत्री खाडे यांनी भाजपची केवळ एकच दहीहंडी असून ती मी सांगेल तीच असेल असे स्पष्ट करून फुटीवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला. भाजपअंतर्गत असलेल्या या मतभेदामुळे पक्षाचे कार्यकर्तेही दुभंगलेल्या मनस्थितीत आहेत. जर खाडे पुत्राबरोबर जावे तर वनखंडे नाराज आणि वनखंडेबरोबर जायचे तर पालकमंत्री यांची खपामर्जी होण्याचा धोका, यामुळे अनेक कार्यकर्ते दोन्ही गटांच्या कार्यक्रमापासून चार हात दूरच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात तर वनखंडे आणि पालकमंत्री स्वतंत्रपणे गणेश मंडळांना भेटी देऊन स्वअस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या गटबाजीची गंभीर दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे. खाडे कुटुंबातील अंतर्गत असणारे मतभेद एकत्र येऊन मिटवावेत, यासाठी पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा, पक्षाकडून वेगळा पर्याय शोधण्याचा इशारा दिला आहे. पक्षाअंतर्गत मतभेदामुळे पक्ष कार्यकर्त्यांची होत असलेली ससेहोलपट थांबविण्यासाठीचा हा इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात येते.