भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या भवितव्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या आघाडीची वाटचाल कशी होणार याबाबत राजकीय वर्तुळातही उत्सुकता आहे.
इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीबद्दल फारशी प्रगती झालेली नाही. काँग्रेस पक्ष पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येच अधिक रस घेत आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीबाबत फारशी चिंता दिसत नाही, असे मत नितीशकुमार यांनी व्यक्त केले होते. नितीशकुमार यांच्या या विधानानंतर इंडिया आघाडीत सारे काही आलबेल नाही हेच समोर आले. मध्य प्रदेशातील जागावाटपात काँग्रेसने विश्सासात घेतले नाही यावरून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनीही काँग्रेस पक्षावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर प्रदेशातील अखिलेश आणि बिहारमधील नितीशकुमार या दोघांनीही काँग्रेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा – जातनिहाय जनगणनेवर भाजपची सावध भूमिका
इंडिया आघाडीच्या ऑगस्ट अखेरीस मुंबईत झालेल्या बैठकीत ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा करावी, असे ठरले होते. पण एकाही राज्यात जागावाटपावर फारशी प्रगती झालेली नाही. जागावाटप हा कळीचा मुद्दा असल्याने जागावाटप लवकर करू नये, असा सल्ला शरद पवार यांनीच अन्य पक्षांना दिला होता. तरीही नितीशकुमार यांनी व्यक्त केलेल्या चिंतेमुळे इंडिया आघाडीची फारशी प्रगती झालेली नाही हे समोर आले.
हेही वाचा – मोदी – पटेल भेटीने २०१९ च्या प्रचार सभेतील मोदींच्या पटेलांवरील टीकेची आठवण
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाल्यास इंडिया आघाडीत काँग्रेसचे प्रस्थ वाढणार आहे. काँग्रेसला अपेक्षित असे निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश आल्यास राज्यनिहाय अन्य घटक पक्ष काँग्रेसला फारशी किंमत देणार नाहीत. काँग्रेस नेत्यांना या वास्तवाची कल्पना आहे. यामुळेच पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतरच इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.