प्रख्यात अभिनेते आणि आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे संस्थापक के. पवन कल्याण आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील वाद नवीन नाही. मागील महिन्यात वायएसआर काँग्रेसच्या सरकारने पवन कल्याण यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता पवन कल्याण यांनी केलेल्या स्टंटबाजीमुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं आहे.
आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील इप्पटम या गावात रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प होत आहे. त्यासाठी अनेक कुटुंबियांच्या घरे पाडण्यात आली आहे. या कुटुंबियांच्या भेटीसाठी पवन कल्याण जात गेले. तेव्हा पोलिसांनी पवन कल्याण यांच्या ताफ्याची अडवणूक करत, जाण्यापासून रोखले. पण, पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर पवन कल्याण कारमधून खाली उतरले आणि चालत जायला निघाले.
हेही वाचा : तीन दशकांपासून भाजपाचा आमदार, गुजरात दंगलीची झळ सोसलेल्या ‘नरोडा’ जागेवर यावेळी कोण जिंकणार?
पवन कल्याण चालत जात असल्याचे पाहून, पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर पवन कल्याण कारच्या छतावर बसले. कारच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा रक्षकही कारला लटकत होते. तर, त्यांच्या कारच्या मागे कार्यकर्ते, चाहते आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा होता. हीच स्टंटबाजी पवन कल्याण यांना भोवली आहे.
पी. शिवा कुमार या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पवन कल्याण त्यांचा चालक आणि काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटलं की, पवन कल्याण यांच्या ताफा जोरात शेजारून जात असल्याने त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला.
हेही वाचा : राजीव गांधी हत्या प्रकरण: दोषींच्या सुटकेचे तामिळनाडूच्या राजकारणात पडसाद का उमटले नाहीत?
यावरून वायएसआर काँग्रेसचे नेते बोट्सा सत्यानारायणा यांनी पवन कल्याण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पवन कल्याण ही स्टंटबाजी करत आहे. सातत्याने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करण्याची त्यांना सवय लागली आहे,” असेही बोट्सा सत्यानारायणा यांनी सांगितलं.
पवन कल्याण यांनी राज्यातील सरकारविरुद्ध रान पेटवल्यामुळे त्यांना ‘पॉवर स्टार’ अथवा ‘पॅकेज स्टार’ म्हणून डिवचलं जातं. या आरोपांवरून चप्पल काढत वाएसआर काँग्रेसच्या नेत्यांना पवन कल्याण यांनी इशारा दिला होता. “तुम्ही मला ‘पॅकेज स्टार’ म्हणाल तर तुम्हाला जोड्याने मारेन,” असं चप्पल हातात धरून कल्याण यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : खांबालियामध्ये १९७२ पासून एकाच समाजाचा आमदार, ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावेळी रेकॉर्ड तोडणार?
तर, १६ ऑक्टोंबर रोजी विशाखापट्टणम येथे पवन कल्याण यांची सभा होणार होती. मात्र, त्यापूर्वी राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या वाहनावर जेएसपी समर्थकांनी हल्ला केला. या हल्लानंतर पवन कल्याण यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. तसेच, त्यांची सभा होऊन दिली नाही. स्थानबद्ध केल्यावर चिडलेल्या पवन कल्याण यांनी ट्विट करत एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये “रामकृष्ण बीचवर फिरण्यासाठी पोलीस मला परवानगी देतील का?” असं लिहलं होतं.