नांदेड : नोकरी-व्यवसायातील महिलांच्या निवास व्यवस्थेसाठी (वसतिगृह) बांधण्यात आलेली वास्तू आता भाजपात प्रवेश घेणार्‍यांचे प्रवेश केंद्र बनली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ही वास्तू माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पत्नी दिवंगत कुसुमताई व त्यांच्या काही सहकार्‍यांनी उभारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये इनकमिंग वाढले आहे. नांदेड मनपाच्या काही माजी नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांचे प्रवेश चव्हाण यांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात शंकरराव चव्हाण यांच्या छायाचित्राच्या साक्षीने झाले. पण त्यावर टीका झाल्यानंतर प्रवेश सोहळ्यांचे सत्र नंतर प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात हलविण्यात आले. दिवंगत कुसुमताई चव्हाण यांनी मागील शतकाच्या उत्तरार्धात स्थापन केलेल्या प्रगती महिला मंडळ या सेवाभावी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी तत्कालीन नांदेड नगर परिषदेने शहराच्या मगनपुरा भागात भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडावर नंतर मोठी इमारत बांधण्यात आली. भूखंड वाटपात गैरप्रकार व अनियमितता झाल्यामुळे हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायापर्यंत गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना दिलासा दिल्यामुळे भूखंडावरील वास्तू प्रगती महिला मंडळाच्या ताब्यात राहिली.

हेही वाचा – पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर

कुसुमताईंच्या पश्चात ही वास्तू चव्हाण परिवाराच्या अधिपत्याखाली आहे. मागील अनेक वर्षे या वास्तूत काँग्रेसच्या बैठका आणि इतर कार्यक्रम होत असत. काँग्रेस पक्षाचे निवडणूक साहित्य ठेवण्यासाठी या वास्तुतील सभागृहाचा वापर वेळोवेळी झाला. या इमारतीतील सभागृह लहान-मध्यम स्वरूपाच्या कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमांकरिता भाडेतत्त्वावर दिले जाते. पण सध्या ही वास्तू भाजपाच्या बैठका आणि पक्षप्रवेश सोहळ्यांचे केंद्र बनली आहे.

हेही वाचा – काशी-मथुरा, समान नागरी कायदा आणि मतदार संघांची पुनर्रचना; नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास काय निर्णय घेऊ शकतात?

मागील तीन आठवड्यांत वरील सभागृहात अशोक चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, ओमप्रकाश पोकर्णा, किशोर स्वामी प्रभृतींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष व इतर संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपाचे उपरणे टाकून त्यांचा पक्षप्रवेश उरकण्यात आला. पण पक्षात नव्याने दाखल झालेल्या या कार्यकर्त्यांची महानगर किंवा भाजपाच्या दप्तरी कोणतीही नोंद नसल्याचे महानगर भाजपाच्या एका पदाधिकार्‍याने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women hostel building in nanded has become admission center for bjp aspirants print politics news ssb