संतोष प्रधान
यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या दोन्ही आमदारांना काँग्रेस कार्यकारी समितीत मिळालेले स्थान किंवा वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती यातून काँग्रेसने राज्यातील महिला नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
काँग्रेस कार्यकारी समितीत राज्यातील तीन महिला नेत्यांना संधी देण्यात आली. यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या दोघींची पहिल्यांदाच निवड झाली आहे. याशिवाय राज्याच्या प्रभारी म्हणून खासदार रजनी पाटील यांची निवड झाली. गटबाजीने पोखरलेल्या राज्य काँग्रेसमध्ये महिला नेत्यांकडे महत्त्वाची पदे सोपविण्यात येऊ लागली आहेत.
हेही वाचा >>> तृणमूल काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याच्या जावायाचा काँग्रेसमध्ये प्रेवश; विरोधकांच्या आघाडीचे काय?
अमरावती जिल्ह्यातील यशोमती ठाकूर या राहुल ब्रिगेडमधील सदस्या म्हणून ओळखल्या जात असत. तिनदा विधानसभेवर निवडून आलेल्या ठाकूर यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला व बालविकास खाते भूषविण्यास मिळाले होते. अलीकडेच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठाकूर यांनी विरोधी बाकावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. हिंदी व इंग्रजीवरील प्रभुत्व आणि दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असल्याने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी ठाकूर यांना मिळाली आहे.
हेही वाचा >>> पोटनिवडणुकीत मतभेद चव्हाट्यावर; समाजवादी पार्टी काँग्रेसविरोधात निवडणूक लढवणार!
सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांचीही कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या याबरोबरच तिसऱ्यांदा आमदारकी भूषविताना प्रणिती यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदाने हुलकावणी दिली तरीही पक्षाने त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सोलापूर हा काँग्रेसचा एकेकाळी असलेला बालेकिल्ला शाबूत राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करून पक्षाने सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. गायकवाड या पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी होत्या. प्रशासनाचा दांगडा अनुभव असलेल्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर मुंबईत काँग्रेसला उभारी देण्याचे मोठे आव्हान असेल.