Women rulers as RSS heroes : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिला आणि पुरुषांना एकाचवेळी मतदानाचा हक्क मिळाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या इतिहासातील हा एक क्रांतिकारी निर्णय मानला गेला. गेल्या काही वर्षांमध्ये देशात महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्यांची मतं मिळविण्यासाठी स्पर्धा करताना दिसून येत आहेत. विशेषतः महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग गेमचेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देखील आपल्या विचारधारेला महिलांच्या नेतृत्वाशी जोडून नारीशक्तीचा उत्सव साजरा करताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांत संघाने मध्ययुगीन भारतातील महिला शासकांच्या जयंती साजरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अहिल्यादेवी होळकर, राणी दुर्गावती आणि राणी अब्बक्का यांच्या जयंती साजरी केल्या जात आहेत. होळकर आणि दुर्गावती यांनी मुस्लीम राज्यकर्त्यांशी लढा दिला, तर अब्बक्का यांनी पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडलं. या तिन्ही महिला शासकांनी हिंदू धर्माचे रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) अलीकडील बैठकीत संघ सरकार्यवाह (सरचिटणीस) दत्तात्रेय होसबळे यांनी राणी अब्बक्का यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त एक निवेदन जारी केले.
आणखी वाचा : औरंगजेबाच्या कबरीवरुन संघाच्या भूमिकेशी शिवसेनेच्या शिंदे गटाची फारकत
कोण होत्या राणी अब्बक्का?
“भारताच्या महान महिला स्वातंत्र्यसेनानी उल्लाला महाराणी अब्बक्का एक कुशल प्रशासक, एक अजिंक्य रणनीतीकार आणि एक अत्यंत शूर शासक होत्या. त्यांनी अनेक शिवमंदिरं आणि तीर्थस्थळं स्थापन करून भारताच्या समावेशकतेच्या परंपरेचं उदाहरण दिलं. महाराणी अब्बक्का यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व धार्मिक समुदायांना समान आदर दिला. तसेच समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास केला,” असं होसबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महान महिला शासक म्हणून राणी अब्बक्का यांची ओळख आहे. त्या कर्नाटकातील उल्लाल या ऐतिहासिक शहरातील तुळूव वंशातील राणी होत्या. त्यांनी कर्नाटकच्या किनारी भागात अनेक वर्ष राज्य केलं. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात राणी अब्बक्का यांनी पोर्तुगीज साम्राज्याविरुद्ध जोरदार लढा दिला आणि त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं.
राणी दुर्गावती यांच्या पराक्रमाची गाथा
गेल्या वर्षी आरएसएसने १६ व्या शतकातील मध्य भारतातील महिला शासक राणी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर उत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती. राणी दुर्गावती या राजपूत कुटुंबातून होत्या. त्यांचा विवाह गोंड कुटुंबातील राजा दलपत सिंह यांच्याशी झाला होता. त्यांनी मुस्लीम आक्रमणकर्त्यांशी अनेक वर्ष लढा दिला. संघाच्या उत्सवात त्यांच्या शौर्याची गाथा सांगण्यात आली. “राणी दुर्गावती यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांनी आपल्या प्रजेचे मुस्लीम आक्रमणकर्त्यांपासून रक्षण केले. एक महिला असूनही त्यांनी तीन वेळा मुस्लीम आक्रमणकर्त्यांचा पराभव केला, असं संघाचे प्रचारक प्रमोद पेठकर यांनी सांगितले. राणी दुर्गावती यांनी मुघल सम्राट अकबराच्या आक्रमणकारी सैन्याशी शौर्याने लढा दिला होता. या युद्धात त्यांच्या सैन्याचा पराभव झाल्यामुळे दुर्गावती यांनी स्वत:चं बलिदान दिलं होतं असं इतिहासकार सांगतात. त्यांच्या मृत्यूनंतर हा दिवस बलिदान दिन म्हणून स्मरण केला जातो.
अहिल्यादेवी होळकरांची जयंती
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाने माळवा राज्याच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचा उत्सव वर्षभर साजरा करण्याची घोषणा केली होती. अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राज्यकर्त्या महिलांपैकी एक होत्या. माळव्याच्या मराठा साम्राज्यातील एक कर्तृत्त्ववान स्त्री म्हणून अहिल्यादेवींची ओळख आहे. त्यांचा जन्म १७२५ साली अहमदनगरच्या चौंडी या गावी झाला. ऐतिहासिक संदर्भानुसार अहिल्यादेवींचा विवाह मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव यांच्याशी वयाच्या आठव्या वर्षी झाला. त्यांच्या पतीचा आणि सासऱ्यांचा युद्धात मृत्यू झाल्यानंतर अहिल्यादेवींनी १७६७ मध्ये मराठा राजवटीखाली असलेल्या माळवा प्रदेशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली.
हेही वाचा : Prakash Karat interview : भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी संघ कशी मदत करतो? विरोधीपक्ष कुठे कमी पडतात?
मुघल शासकांकडून हिंदू मंदिरांची नासधूस
इतिहासातील एक स्त्रीवादी व्यक्तिमत्त्व म्हणून अहिल्यादेवींचं स्मरण केलं जातं. त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा पुढाकार घेतला. अहिल्यादेवींनी त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत महिला सक्षमीकरणावर काम केले, जो मध्य भारतातील सर्वात समृद्ध काळांपैकी एक मानला जातो. संघासाठी अहिल्यादेवींचे महत्त्व त्यांच्या मंदिर राजकारणाशीदेखील जोडले गेले आहे. ११ व्या शतकात गझनीचा महमूद आणि १७ व्या शतकात औरंगजेबाने देशभरातील अनेक हिंदू मंदिरे उद्धवस्त केली होती. अहिल्यादेवींनी या हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला, ज्यामध्ये सोमनाथ मंदिर आणि वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर यांचा समावेश होता.
संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
दरम्यान, संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “आरएसएसने सुरुवातीपासूनच मुघल किंवा ब्रिटिशांशी लढणाऱ्या राज्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. दुर्दैवाने, मध्ययुगीन भारताच्या ऐतिहासिक कथेवर मुघलांचे वर्चस्व आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या महान भारतीय व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाला लोकप्रिय करण्याचा संघाचा उद्देश आहे. मुघलांना पराभूत करणारे लचित बोरफुकन यांची जयंतीही आम्ही तितक्याच उत्साहाने साजरी केली आहे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पुरुषप्रधान संघ आहे अशी अनेकदा टीका होते. २०२२ मध्ये प्रथमच संघाने त्यांच्या वार्षिक दसरा मेळाव्यात महिला पाहुण्या म्हणून गिर्यारोहक संतोष यादव यांना निमंत्रित केलं होतं. विशेष बाब म्हणजे, त्याआधी झालेल्या बैठकीत संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघात महिलांच्या सहभागाच्या कमतरतेवर खेद व्यक्त केला होता.