प्रसाद रावकर
साधारण सत्तरचे दशक उतरणीला लागले होते. शिवासेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले अनेक तरूण – तरूणी शिवसेनेच्या छत्राखाली एकवटत होते. त्यापैकीच एक मीना कांबळी. गिरगावला खेटून असलेल्या चिराबाजारात वास्तव्यास असलेल्या मीना कांबळी सुरुवातीच्या काळात शिवसेनेचा छोटा-मोठा कार्यक्रम, उपक्रम, शिबिरांमध्ये सहभागी होत होत्या. शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या काळी प्रमोद नवलकर, गजानन कीर्तीकर, भाई मिर्लेकर, विलास अवचट अशी दिग्गज मंडळी शिवसेनेत कार्यरत होती. सर्वसामांन्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ, दांडगा जनसंपर्क, दक्षिण मुंबईमधील आंदोलन, मोर्चामध्ये हळूहळू त्या आघाडीवर दिसू लागल्या आणि १९८४ मध्ये त्यांना महिला शाखाप्रमुखपद बहाल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्याचा आलेख उंचावतच गेला आणि १९९२ मध्ये दक्षिण मुंबईमधील पहिल्या महिला विभागप्रमुखपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांची उठबस सुरू झाली. महत्त्वाच्या बैठकांमध्ये त्या आवर्जून दिसू लागल्या. दरम्यानच्या काळात त्या “मातोश्री”च्या मर्जीतील एक बनल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्याशीही मीना कांबळी यांचे घनिष्ठ संबंध होते. पुढे त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबरोबर त्या दिसू लागल्या. ‘मातोश्री’ वर येणे-जाणे वाढल्यामुळे दक्षिण मुंबईत त्यांची मानमराबत वाढत गेली. त्याचबरोबर शिवसेनेच्या महिला आघाडीतही त्यांचा दबदबा वाढत गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> समीर भुजबळ की राखी जाधव, कोण बाजी मारेल ?

‘मातोश्री’शी जवळीक वाढली तशीच त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षाही बळावली. २०१२ मध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. सारी तयारी केली पण ऐनवेळी थांबण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर मातोश्रीने त्यांचा कधीच आमदारकीसाठी विचार केला नाही. हा सल त्यांच्या मनात कायम राहिला. प्रियंका चतुर्वेदी, नीलम गोऱ्हे वा मनीषा कायंदे आदी अन्य पक्षातून आलेल्यांना खासदारकी-आमदारकी मिळाली, पण शिवसेनेसाठी एवढ्या खस्ता खाऊनही पद मिळाले नाही ही त्यांची नाराजी होती. शिवसेनेने त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गिरगाव, चिराबाजार, कुंभारवाडा आणि आसपासच्या परिसरातून त्यांना विजयी होता आले नाही.

एकेकाळी शिवसैनिकांच्या मनात मानाचे स्थान मिळविणाऱ्या मीना कांबळी यांच्याबद्दल महिला आघाडीमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. त्याबद्दल ‘मातोश्री’वर तक्रारी जाऊ लागल्या. पण ‘मातोश्री’ नेही कानाडोळा केला आणि महिला आघाडीत धुसफूस सुरू झाली. मीना कांबळी यांच्याविरोधात ‘ मातोश्री’वर तक्रार करणाऱ्या महिला पदाधिकारी आशा मामेडी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या. त्यातून मीना कांबळी यांच्याविरोधातील धुसफूस चव्हाट्यावर आली. तरीही ठाकरे यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही.

हेही वाचा >>> कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांचा घोषणांचा सुकाळ, प्रत्यक्ष हाती किती लागणार ?

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत दक्षिण मुंबईत शिवसेनेचा सपाटून पराभव झाला होता. त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात मीना कांबळी यांनाही उतरविण्यात आले होते. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दक्षिण मुंबईत तेव्हा भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण मुंबईत शिवसेनेचा एवढा मानहानीकारक पराभव यापूर्वी कधीच झाला नव्हता. दक्षिण मुंबईत पक्षातील त्यांचे महत्त्व आपोआप कमी कमी होत गेले. तरीही रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या यादीत त्यांचे स्थान कायम होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील समीकरणे बदलली होती. ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला रश्मी ठाकरे भेट देण्यासाठी गेल्या वर्षी व यंदा आल्या तेव्हा महिला आघाडीची मुंबईतील फौज त्यांच्याबरोबर होती. यंदा मीना कांबळी नव्हत्या. त्याच दिवशी त्यांचा शिंदे गटात प्र‌वेश झाला. विधान परिषदेची आमदारकी आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या भाच्याला सरकारी नोकरी मिळू शकली नाही, हा सल आपल्या मनात कायम असल्याचे मीना कांबळी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यावर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेतेमंडळींची यादी जाहीर झाली. तेव्हापासून मीना कांबळी नाराज होत्या, असे म्हटले जाते. तशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे गट सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या मीना कांबळी यांना दक्षिण मुंबईत चमक दाखविण्यासाठी किती संधी मिळेल हे एक प्रश्नचिन्हच आहे. कारण शिंदे गटाची भाजपशी युती आहे. ठाकरे गटाला नामहोरम करण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला जाऊ शकतो. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे यानंतर मीना कांबळी या तीन महत्त्वाच्या महिला नेत्यांनी गेल्या सहा महिन्यांत ठाकरे गटाची साथ सोडली. याचा उद्धव ठाकरे यांनाही जरूर विचार करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women wing chief meena kambli resign from thackeray group joined shinde shiv sena print politics news zws