मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सभागृहाच्या बाहेरच विरोधकांवर टीकास्र सोडले आहे. आज राजस्थानमधील सिकर येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “आता बास झाले, राजस्थान ही शूरवीरांची भूमी आहे. राजस्थानी लोक याचना करणारे नाही, तर रणांगणात गर्जना करणारे आहेत. त्यामुळेच राज्यात एकच गर्जना यावेळी ऐकू येणार आहे. ती म्हणजे, “बेहेन, बेटियोपर अत्याचार, नही सहेगा राजस्थान”, अशी आक्रमक भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली.
दलितांवरील अत्याचार, कर्जबाजारी झालेला शेतकरी, पेपरफुटीचे प्रकरण आणि राज्यातील भ्रष्टाचार यांच्या विरोधातही पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारची घोषणा दिली. यासह पंतप्रधान मोदींनी लाल डायरीचाही विषय काढला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी लाल डायरीच्या विषयावरून मुख्यमंत्री गहलोत यांच्यावर टीका केली होती. याचाच संदर्भ घेऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस म्हणजे लुटीची दुकानं, असत्याचा बाजार आणि या लुटीच्या दुकानातील नवीन माल आहे ती, लाल डायरी”
माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून विधानसभेतच गहलोत सरकारवर टीका केल्यानंतर त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. हकालपट्टी झाल्यानंतर राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीचा मुद्दा पुढे केला. या डायरीमध्ये मुख्यमंत्री गहलोत यांच्या काळ्या कामांची यादी असल्याचा आरोप राजेंद्र सिंह गुढा यांनी केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी धर्मेंद्र राठोड यांच्या घरावर २०२० साली प्राप्तीकर खात्याने धाड टाकल्यानंतर गुढा यांनी त्या ठिकाणाहून ही यादी मिळवली होती, असा दावा गुढा यांनी केला होता.
हे वाचा >> “त्या ‘लाल डायरी’मुळे अशोक गहलोत यांचे मुख्यमंत्री पद जाईल”, माजी काँग्रेस मंत्र्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान मोदी म्हणाले, “गुढा यांनी लाल डायरीचा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही स्तब्ध झाले होते. या नेत्यांनी आता जरी तोंडावर बोट ठेवले असले तरी निवडणुकीच्या वेळेस ही लाल डायरी काँग्रेसचा डब्बा गोल (निवडणुकीत फारशा जागा मिळणार नाहीत) करेल.” तसेच राजस्थानमधील विविध सरकारी परिक्षांचे पेपरफुटीप्रकरणावरही पंतप्रधानांनी तोंडसुख घेतले. पेपरफुटी प्रकरणावर राजस्थान सरकार दोन पावले मागे गेलेली आहे. नुकतेच सरकारने पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देणारा कायदा मंजूर केला.
भाजपाविरोधी आघाडीने इंडिया असे नाव धारण केल्यावरही मोदींनी पुन्हा एकदा टीका केली. ईस्ट इंडिया कंपनी आणि इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाचा उल्लेख करत या नावामुळे राष्ट्राच्या भावना दुखावल्या असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने मागच्या नऊ वर्षांत राजस्थानला खूप काही दिले आहे. एवढे तर युपीए सरकारने दहा वर्षांच्या काळातही दिले नव्हते, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “केंद्रात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा राजस्थानला केवळ एक लाख कोटी रुपये मिळाले होते. पण मागच्या नऊ वर्षांच्या काळात आम्ही राज्याच्या विकासासाठी चार लाख कोटी रुपये दिले आहेत.”
आणखी वाचा >> ‘आमची तुलना मणिपूरमधील तुमच्या अपयशाशी करू नका’, राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना प्रत्युत्तर
राजस्थानमध्ये जेव्हापासून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून विकास कामात केवळ अडथळे निर्माण केले जात आहेत. याचे उदाहरण देत असताना मोदी यांनी जल जीवन मिशन योजनेचा उल्लेख केला. या योजनेंतर्गत नऊ कोटी कुटुंबांना नवीन नळ जोडणी मिळाली आहे. इतर राज्यांनी ही योजना पूर्णत्वास नेली असून राजस्थान सरकारने योजनेला गती दिलेली नाही. काँग्रेस लोकांना तहानलेली ठेवू इच्छिते का? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही प्रत्युत्तर दिले. “मी ऐकले की, पंतप्रधानांनी सिकरमध्ये आज लाल डायरीचा उल्लेख केला. पंतप्रधानांच्या पदाला एक प्रतिष्ठा आहे. त्यांच्याकडे प्राप्तीकर विभाग, ईडी, सीबीआय आहे¨ ज्याचा त्यांनी देशभरात गैरवापर केला. या यंत्रणांना आजवर या लाल डायरीची माहिती कशी मिळाली नाही? भाजपाचे लोक एवढे घाबरलेले का आहेत? खरेतर पंतप्रधानांनी टॉमेटोच्या वाढलेल्या दरांबाबत बोलायला हवे”, अशा शब्दात गहलोत यांनी पलटवार केला.
हेदेखील वाचा >> संसदेत चर्चा नाही; पण राजस्थान विधानसेभेने मणिपूरविरोधात मंजूर केला ठराव, पश्चिम बंगालही ठराव करणार
पंतप्रधान ज्या लाल डायरीबाबत बोलत आहेत, ती केवळ काल्पनिक आहे. अशी कोणतीही डायरी नाही. फक्त राजकारणासाठी हा बागुलबुवा उभा केला गेला आहे, अशी टीका गहलोत यांनी केली.