पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी बुधवारी येथे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. सूत्रांनी सांगितले की, ते काँग्रेसच्या तिकिटावर आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दोन्ही पैलवानांच्या जागा निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जुलानामधून फोगट आणि बदली मतदारसंघातून पुनिया यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवर राहुल गांधींचा फोगट आणि पुनियाबरोबरचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दोन्ही कुस्तीपटूंना उमेदवारी देण्याबाबतचे चित्र गुरुवारपर्यंत स्पष्ट होईल, असे हरियाणाचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी सांगितले. पुनिया हा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आहे. तर फोगट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. तथापि, ५० किलो वजनी गटात जवळपास १०० ग्रॅमने वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली. भाजपचे माजी खासदार आणि तत्कालीन कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल २०२३ मध्ये करण्यात आलेल्या निषेधात पूनिया आणि फोगट हे सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>कारण राजकारण: गुवाहाटीहून परतलेल्या ठाकरेंच्या शिलेदाराची कसोटी

दरम्यान, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारपर्यंत ९० पैकी ६६ ठिकाणचे उमेदवार जवळपास निश्चत केले आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीत हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा सुरू असून अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestlers bajrang punia and vinesh phogat meet rahul gandhi print politics news amy