बदलती राजकीय स्थिती आणि मिळाले उमेदवारीबाबत काय वाटते ?
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राजकीय समीकरणे बदलली आहेत. एक गृहिणी, नगरसेविका आणि आमदारीचा अनुभव गाठीशी आहे. सर्वसामान्य नागरिकांमधील एक या भावनेतून ही निवडणूक लढविता आहे. भाजप नेत्या जयवंतीबेन मेहता यांच्यानंतर तब्बल २० वर्षांनी एका महिलेला या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी चालून आली आहे. संमिश्र लोकसंख्येचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे मतदार सारासार विचार करूनच मतदान करतील असा विश्वास आहे.
राजकीय समीकरण बदलल्यामुळे मतदार तुमच्या पाठीशी राहतील ?
एकेकाळी मराठी भाषक बहुल मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ ओळखला जात होता. फेररचनेत या मतदारसंघाचा शिवडीपर्यंत विस्तार झाला आहे. कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा आणि शिवडी असे सहा विधानसभा मतदारसंघांचा दक्षिण मुंबई मतदारसंघ बनला आहे. गेल्या काही वर्षात मराठी टक्का कमी झाला असला तरी तोही आज महत्त्वाचा घटक आहे. परराज्यांतून नोकरी-व्यवसायानिमित्त आलेलेे अनेक जण या मतदारसंघात वास्तव्यास आहेत. तसेच अल्पसंख्यांकाची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात संमिश्र लोकवस्ती आहे. नगरसेवक वा आमदार झाल्यानंतर उच्चभ्रू आणि गरीबांच्या वस्त्यांमध्येही काम केले. त्यावेळी एखाद्या विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम केलेले नाही. त्यामुळे मतदार मला माझ्या कामाची मताच्या रुपात नक्कीच पोचपावती देतील.
हेही वाचा >>>मतदारसंघाचा आढावा : ईशान्य मुंबई- भाषिक आणि धार्मिक वळणार गेलेली लढत
आर्थिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईसाठी काय करणार ?
दक्षिण मुंबईमध्ये मुख्य बाजारपेठा, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अनेक नागरिक दूरवरून दक्षिण मुंबईत येतात. त्यामुळे केवळ इथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनाच नव्हे, तर नोकरी-व्यवसायानिमित्त येणाऱ्यांनाही चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. निवडून आल्यानंतर केंद्र सरकार दरबारी या आर्थिक केंद्राचे स्थान जगभरात उंचावे यादृष्टीने प्रयत्न करणार.
हेही वाचा >>>उमेदवारांची भूमिका : ईशान्य मुंबई- मतदारांना बदल हवा आहे- संजय दिना पाटील
दक्षिण मुंबईमधील कोणत्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे ?
जुन्या जिर्ण झालेल्या उपकरप्राप्त आणि उपकरप्राप्त नसलेल्या असंख्य इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, वाहने उभी करण्यासाठी आवश्यक असलेली वाहनतळे, आरोग्याच्या दर्जेदार सुविधा, महिलांचे निरनिराळे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल. पुनर्विकासात जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानदारांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे ते पुनर्विकासासाठी राजी होत नाहीत. निवासी गाळेधारकांबरोबर व्यावसायिकांचाही पुनर्विकासात कसा फायदा होईल याचा विचार होणे गरजेचे आहे. भविष्यात या संदर्भात अभ्यास करून योग्य योजना तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात येईल. महिला पोलीस, महिलांसाठी एक रुपयात १० सॅनिटरी पॅड, मोफत शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल.
दक्षिण मुंबईतील रुग्णालयांची अवस्था फारच बिकट झाली आहे. याबाबत तुमची भूमिका काय आहे?
दक्षिण मुंबईत नायर, कस्तुरबा, जीटी, कामा, सेंट जॉर्ज, जे.जे. आदी मोठी रुग्णालये आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असल्याने या रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे. या रुग्णालयांमधील आरोग्य सेवेच्या विस्तारासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गरीब रुग्णांवर केंद्र, राज्य सरकारच्या योजनांमधून रुग्णावर स्वस्तात वा विनामुल्य शस्त्रक्रिया कशी करता येईल यासाठीही काम करणार आहे.
(मुलाखत : प्रसाद रावकर)