Sandeep Bajoria in Yavatmal Vidhan Sabha Constituency यवतमाळ – उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी होत असताना आता यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची यात भर पडली आहे. यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष विधानपरिषदेचे माजी सदस्य संदीप बाजोरीया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यामुळे यवतमाळची लढत आता चौरंगी होण्याची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. येथून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नीशील असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीही आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाजोरीया यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नसला तरी त्यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ते अपक्ष म्हणून येथून निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडीत यवतमाळच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना उबाठा या तिन्ही पक्षांनी दावा केला होता. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षालाच सुटणार असे सांगत गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला. मात्र आता या जागेवर काँग्रेसने उमदेवार दिल्याने बाजोरीया यांनी बंड केले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचेही बाजोरीया यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून स्पष्ट केले. बाजोरीया यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून यवतमाळ विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांना १७ हजार ९०९ मते मिळाली व ते पाचव्या क्रमांकावर होते. यावेळी संदीप बाजोरीया यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास यवतमाळ मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान निर्माण होईल.

हेही वाचा >>>Warora Vidhan Sabha Constituency: वरोऱ्यात काँग्रेस, भाजपमध्ये बंडाचे वारे

याशिवाय प्रहार, बसपा, वंचित बहुजन आघाडीचे उमदेवारही यवतमाळातून लढणार आहेत. वंचितकडून डॉ. नीरज वाघमारे लढणार आहेत. बसपाकडून तारीक लोखंडवाला यांचे नाव आहे. शिवाय तिसऱ्या आघाडीकडून प्रहारचे बिपीन चौधरी यांनी उमदेवारी दाखल केली. या सर्व उमदेवारांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपला होईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर तिन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकदिलाने कामाला लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

निवडणूक लढण्यावर ठाम – संदीप बाजोरीया

महाविकास आघाडीत यवतमाळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला न सुटल्याने आपण पक्षाच्या वतीनेच उमेदवारी अर्ज दाखल केला. आता एबी फॉर्म मिळणार नसल्याने अपक्ष म्हणून रिंगणात कायम राहणार आहो. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा विचार घेवून उमेदवारी दाखल केली आहे. ती मागे घेणार नाही. या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.