यवतमाळ : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून गेल्या तीन निवडणुकांमध्ये बसपा किंवा वंचितसारख्या पक्षांनी काँग्रेसच्या विजयाची वाट बिकट केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर यंदा वंचितच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे पुन्हा नुकसान होणार का, याचा पक्षाच्या वतीने आढावा घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना काँग्रेस अशी पारंपरिक लढत होत आहे. यावेळी मात्र चित्र जरा वेगळे आहे. या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर प्रथमच काँग्रेस या निवडणुकीत प्रत्यक्ष लढणार नाही. तर शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी एकाच घरातून वेगळे झालेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. मात्र या दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. भावना गवळी यवतमाळ-वाशिम लोकसभा अस्तित्वात येण्यापूर्वी वाशीम लोकसभा मतदारसंघाच्याही खासदार राहिल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात त्या २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडणूक जिंकल्या आहेत.

हेही वाचा – मीरा भाईंदरमधील भाजप-शिवसेना वाद शिगेला

पहिल्या दोन निवडणुकीत बसपा आणि तिसऱ्यावेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी तारणहार ठरला. २००९ मध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी बसपाकडून दिलीप एडतकर हे रिंगणात होते. त्यांनी ६२ हजार ७८१ मते घेतली. ही मते पारंपरिकपणे काँग्रेसच्या बाजूने असतात. मात्र बसपाने निवडणूक लढविल्याने त्याचा फायदा तेव्हाच्या भाजप-शिवसेना युतीला झाला आणि काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव झाला.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून भावना गवळी रिंगणात होत्या. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे रिंगणात होते. याही निवडणुकीत भावना गवळी यांनी शिवाजीराव मोघे यांचा तब्बल ९३ हजार ८१६ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत बसपाचे बळीराम राठोड यांना ४८ हजार ९८१ मते पडली. यावेळीसुद्धा बसपाने काँग्रेसचे मताधिक्क्य कमी केले. २०१९च्या निवडणुकीत भावना गवळी तिसऱ्यांदा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात होते. यावेळी भावना गवळी यांनी एक लाख १७ हजार ९३९ इतक्या प्रचंड मतांनी माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार यांना ९४ हजार २२८ मते पडली होती. या निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेसला फटका बसला.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपा, वंचित बहुजन आघाडी हे कॅडर आधारित पक्ष काँग्रेससाठी नेहमीच मारक ठरले आहेत. याची पुनरावृत्ती २०२४ मध्येही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्यापही तळ्यात मळ्यात आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे यांना विचारणा केली असता, महाविकास आघाडीत सहभागी झालो तर त्यांच्यासोबत राहू. महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा राहिल. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे, असे वाघामारे यांनी सांगितले. वंचित पक्ष यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा फटका पुन्हा महाविकास आघाडीला बसून महायुतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal washim lok sabha bhavana gawali vanchit yavatmal washim will repeat the result or change the picture print politics news ssb
Show comments