यवतमाळ : विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारणे, त्यानंतर मराठवाड्यातील राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी या घडामोडींमुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून गेली १५ वर्षे शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या शिंदे गटापुढे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारते याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मतदारसंघातील लढतीला कुणबी विरूद्ध देशमुख अशी जातीय किनार दिली जात आहे.
यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्मितीपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यापूर्वी यवतमाळमध्ये काँग्रेसचे तर वाशिममध्ये शिवसेनेचे प्राबल्य होते. राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी दुहेरी लढत होत असली तरी यावेळी प्रथमच शिवसेनेतील दोन्ही गट लोकसभेत आमने-सामने आले आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्याचील लढत ‘शिवसेना विरूद्ध शिवसेना’ अशीच होत आहे.
आणखी वाचा-“विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता नसलेली काँग्रेस सत्तेत काय येणार?” माजी पंतप्रधान देवेगौडांची टीका
महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासह १७ उमेदवार रिंगणात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने एरवी काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारा वंचितचा उमेदवार रिंगणात नाही. मात्र ओबीसी व बंजारा समाजाचे नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड हे बसपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. ते प्रचारात कुठेही नसले तरी त्यांच्या उमेदवारीचा थोडाफार फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारास बसण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पक्षाने उमदेवारी नाकारून त्यांच्याऐवजी राजश्री हेमंत पाटील यांना उमदेवारी दिली. राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळ असले तरी त्यांचे वास्तव्य नांदेड येथे आहे. त्यामुळे महायुतीने बाहेरचा उमेदवार लादल्याची हवा विरोधकांनी केली. राजश्री पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित झाली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी ‘माहेरच्या लेकीस संधी द्या’, या भावनिक मुद्यावर राजश्री पाटील यांचा प्रचार सध्या फिरत आहे.
आणखी वाचा-गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना मतदारसंघात फिरायला पुरेसा वेळ मिळाला आहे. ते यापूर्वी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे सध्या मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे. ग्रामीण भागात भाजपच्या शेतीविरोधी धोरणांबद्दल असलेला रोष आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती ही संजय देशमुख यांची जमेची बाजू ठरली आहे.
या मतदारसंघात यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशिम या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत राजश्री पाटील यांना होत आहे. याशिवाय राजश्री पाटील यांच्या उमदेवारीमुळे महायुतीने कुणबी विरूद्ध देशमुख असे विभाजन करण्यात यश मिळविले. बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड यांच्यासोबत आहे. यवतमाळ शहरात भाजपचे आ. मदन येरावार यांचे प्राबल्य व संघाचे गठ्ठा मतदान आहे. त्याचाही फायदाही राजश्री पाटील यांना मिळणार आहे. राळेगाव या आदिवासी राखीव विधानसभा मतदासंघात भाजपचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. इंद्रनील नाईक व भाजपचे विधान परिषद सदस्य नीलय नाईक हे सोबत आहे. मतदारसंघात वर्चस्व असलेले तेली, माळी, धनगर यांच्यासह अनुसूचित जाती व अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.
भाजपतच्या दबावामुळे शिंदे यांनी ऐनवेळी उमेदवार बदलला. यातून स्वत:च्या पक्षात निर्णय घेण्याचे शिंदे यांना अधिकार नाहीत. अशा पक्षाला मतदान करणार का, असा सवाल ठाकरे गटाकडून प्रचाराकत केला जात आहे.
आणखी वाचा-तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
भावना गवळींची भूमिका निर्णायक
उमदेवारी नाकारलेल्या खासदार भावना गवळी या नाराज झाल्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर महायुतीच्या उमदेवाराचा प्रचार करू, असे जाहीरपणे सांगितले. पंरतु त्यांचे कार्यकर्ते खरंच मनापासून करतील का, ही शंका आहे. महायुतीस भक्कम राजकीय पाठबळ असुनही ग्रामीण भागात भाजप आणि मोदींबद्दल असलेली नाराजी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
मतदासंघाचा इतिहास लाकसभेच्या निर्मितीपासून १९७१ आणि १९९६ मधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता जिल्ह्यात १९९९ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यात १९८० पासून १९९९ पर्यंत केवळ १९९६ चा अपवाद वगळता उत्तमराव पाटील हे सहा वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. २००९ पासून यवतमाळ-वाशिम मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासनू शिवसेनेच्या भावना गवळी या येथील खासदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतर गवळी शिवसेना शिंदे गटात गेल्या.