यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहे. मात्र अद्यापही महायुतीचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे महायुतीत संभ्रम कायम असून, मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार शिवसेना (शिंदे गट)चा राहणार आहे. मात्र उमेदवारी विद्यमान खासदार भावना गवळी यांना मिळणार की, मंत्री संजय राठोड किंवा त्यांच्या पत्नी शितल राठोड या उमेदवार असतील, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. महायुतीत पाच, सहा जागांचा घोळ आहे. त्यात यवतमाळ – वाशिमचाही समावेश असल्याने महायुतीचे कार्यकर्ते सैरभैर आहेत. भावना गवळी यांना उमेदवारी द्यायची असती तर शिवसेनेने पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा केली असती. मात्र भाजपने गवळी यांच्या नावाला कडाडून विरोध केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरही पेच निर्माण झाला आहे. भावना गवळी समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून गवळी यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यांना मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचे आदेश देवून आठवडा उलटला. मात्र अद्यापही उमेदवार घोषित न झाल्याने गवळी समर्थकांची चिंता वाढली आहे. तर खा. भावना गवळी या उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरिता खिंड लढवित आहेत. दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांच्याच भोवती लोकसभा निवडणुकीचे राजकारण फिरत असल्याचे दिसते. त्यामुळे शिवसेने(शिंदे गट) च्या निर्णयाकडे यवतमाळ- वाशिमसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : शुभमंगल नंतर आधी सावधान! पोलिसांनी नवरदेवाच्या गाडीची घेतली झाडाझाडती; काय आहे नेमका प्रकार?
महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारास लागले आहे. संजय देशमुख हे मंगळवारी, २ एप्रिल रोजी शिवसेने चे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ७२ तास शिल्लक असताना महायुतीने उमेदवारी घोषित न केल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर प्रचारासाठी केवळ दोन आठवड्याचा अवधी महायुतीला मिळणार असून उमेदवाराची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : गडचिरोलीत ‘इंडिया’ आघाडीत फूट, शेकाप नेत्याचे गंभीर आरोप; दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!
यवतमाळ जिल्ह्यात येत असलेल्या चंद्रपूर – आर्णी व हिंगोली – उमरखेड या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवार जाहीर केल्याने अर्ध्या यवतमाळ जिल्ह्यात प्रचाराने जोर पकडला आहे. तर, यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीतील उमेदवार घोषीत न झाल्याने प्रचार कुणाचा करावा, असा प्रश्न महायुतीतील कार्यकर्ते विचारत आहेत.