नाशिक – मराठा विरुद्ध ओबीसी वादाची धार चढलेल्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी चक्रव्यूह भेदत सलग पाचव्यांदा विजय मिळवला. मात्र जातीय ध्रुवीकरणामुळे गतवेळच्या तुलनेत त्यांच्या मताधिक्यात लक्षणीय घट झाली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे निवडणुकीआधी मध्यरात्रीपर्यंत या भागात फिरले होते. जिल्ह्यात स्वपक्षीय व मित्रपक्षांचे उमेदवार ४० हजार ते तब्बल सव्वा लाखांहून अधिकच्या फरकाने निवडून आले असताना मराठा-ओबीसी संघर्षाची झळ एकट्या भुजबळांना बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येवला मतदार संघात २००४ पासून असलेले छगन भुजबळ यांचे एकहाती वर्चस्व यावेळीही अबाधित राहिले. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतरही मतदारसंघावरील त्यांची पकड सैल झाली नव्हती. २०१९ मधील निवडणूक ते ५६ हजार ५२५ मतांच्या फरकाने जिंकले होते. आजवरच्या निवडणुकीत भुजबळांचे हे सर्वाधिक मताधिक्य होते. विविध योजनांच्या प्रभावाने महायुतीचे जिल्ह्यातील सर्व १४ उमेदवार विजयी झाले. त्यांच्या मताधिक्यात दुप्पट ते सातपट इतकी विक्रमी वाढ नोंदविली गेली. भुजबळ मात्र त्यास अपवाद ठरले. गतवेळच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य निम्म्याने कमी होऊन २६ हजार ४०० वर आले.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाचे ‘पानिपत’

मराठा-ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे-छगन भुजबळ यांच्यात बराच काळ संघर्ष चालला. मतदानाच्या तोंडावर जरांगे यांनी येवल्याचा दौरा करुन पाडापाडीचे आवाहन केले होते. स्थानिक जातीय समीकरणे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने (शरद पवार) मराठा समाजाच्या ॲड. माणिकराव शिंदे यांना मैदानात उतरवल्याने निवडणूक चुरशीची झाली. जातीय ध्रुवीकरणामुळे मराठा समाजाची अपेक्षित मते भुजबळांना मिळाली नाहीत. त्याची परिणती त्यांचे मताधिक्य घसरण्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – ‘हे’ मतदारसंघ जातीय समीकरणापलीकडे आणि पक्षीयप्रेमाच्या वस्तूपाठाचे

आमचे मित्र जातीवादी प्रचार करुन रात्री दोनपर्यंत फिरले. काही लोक भुलले. तथापि, दलित, मातंग, आदिवासी, संपूर्ण ओबीसी व मुस्लीम समाज एकजुटीने मागे उभा राहिला आणि शेवटी इभ्रत राखली, अशा शब्दांत भुजबळांनी कमी झालेल्या मताधिक्यावर नाराजी व्यक्त करुन जरागेंचा नामोल्लेख टाळून टीका केली. मराठा समाजातील काही जण नातेवाईकांचा विरोध पत्करून आपल्याबरोबर राहिले. विधानसभेच्या निकालाने येवल्यासह राज्यात जातीयवादाला थारा नसल्याचे सिद्ध केल्याचा दाखला देत भुजबळांनी नव्याने जरांगेंशी दोन हात करण्याची तयारी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeola constituency chhagan bhujbal 5th victory maratha obc issue print politics news ssb